चिरतरुण मावशीला मानाचा मुजरा!

आसावरी जोशी,ajasavari@gmail.com

कांदा संस्थानची महाराणी… चिरतरुण ‘मोरूची मावशी’. अर्थात ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण. नुकताच त्यांना राज्य शासनाचा चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर झाला. त्या निमित्ताने त्यांच्याशी झालेल्या दिलखुलास गप्पा…

रंगमंचावर सळसळत्या उत्साहाचा पुरेपूर ऊर्जेने भरलेला वावर… विनोदाची उत्तम जाण… आणि त्याहीपेक्षा संवादफेकीची अचूक वेळ… नितांत देखण्या… अगदी आजही मनास मोहवणाऱया रेशमी… झळाळत्या रंगीबेरंगी साडय़ा… अंगभूत रुबाब… तरीही या साऱया गंभीर साजातूनही स्वतःची खटय़ाळ ओळख दाखवणारे विलक्षण बोलके डोळे…

हे सारे वर्णन आहे कांदा संस्थानची महाराणी मोरूच्या चिरतरुण मावशीचे… या मोरूच्या मावशीने ८० च्या दशकापासून मराठी रंगभूमीच्या अस्सल प्रेक्षकांना आणि निस्सिम चाहत्यांना आजतागायत हसवत ठेवले आहे. मी स्वतः वयाच्या दहाव्या वर्षापासून मोरूच्या मावशीची प्रचंड चाहती झाले. अगदी खरं सांगायचं तर नाटक म्हणजे काय… हे मला मोरूच्या मावशीने शिकवलं.

आचार्य अत्र्यांची कसदार लेखणी, अशोक पत्कींचं ठेका धरायला लावणारं श्रवणीय संगीत, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन यांची उत्तम साथ आणि दोन अडीच तास संपूर्ण रंगमंच आणि असंख्य प्रेक्षकांची मनं अक्षरशः काबीज करणाऱया मावशीचा सफाईदार, देखणा वावर. हे नितळ देखणं नाटक मावशी ‘जगणाऱया’ विजय चव्हाण अर्थात आपल्या सगळ्यांच्या विजूमामांनी अजरामर करून ठेवले आहे.

आता परवाच्या रविवारी विजूमामांना समर्पित कारकीर्दीनिमित्त महाराष्ट्र शासनाचा चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार घोषित झाला… आणि ‘फुलोरा’च्या पहिल्या पानासाठी असलेले सारे विषय एका क्षणात मागे पडले… व पहिल्या पानावरील मुख्य लेखाच्या स्थानावर कांदा संस्थानची महाराणी विराजमान झाली.

आधी विजूमामांशी फोनवरूनच बोलायचे ठरले. कदाचित आता अभिनंदनासाठी होणाऱया गर्दीत प्रत्यक्ष भेटायला वेळ नसेल अशी मनाची समजूत घालून मी फोनवरून मुलाखत घेण्यास सुरुवात केली. पण पहिल्या प्रश्नापासूनच कुठेतरी, काहीतरी चुकतंय खास असे वाटू लागले… आणि मी विजूमामांना प्रत्यक्ष भेटीची विनंती केली. लगेचच होकार देऊन मंगळवार सकाळ साडेनऊची वेळ मामांनी देऊनही टाकली. मुलुंड पश्चिमेकडचे विजूमामांचे टुमदार, प्रशस्त घर. आता मामा थोडे थकलेत… नाकाला ऑक्सिजनची टय़ूब… ती सतत लावावी लागते. पण त्या टय़ूबआडून लुकलुकणारे डोळे मात्र तसेच… विलक्षण ऊर्जेने भरलेले आणि भारलेले… मूळचा खटय़ाळ स्वभाव दाखवणारे… चिरतरुण मावशीच्या तल्लख आणि कुशाग्र बुद्धीची साक्ष देणारे.

vijay-chavan-2

वडिलांची आठवण

विजूमामा भरभरून बोलू लागले. पुरस्कार जाहीर झाल्याचा फोन आल्यानंतर सर्वप्रथम वडिलांची आठवण आली. आमचे बालपण गिरणगावात गेले. वडिलांना अभिनयाची अतिशय आवड. खूप उत्साहात ते राजकमल स्टुडिओत स्क्रीन टेस्ट द्यायला गेले. तेव्हा अभिनेत्यांना गाणं येणंही अपरिहार्य असायचे. वडिलांच्या बरोबर टेस्ट द्यायला अशोककुमार दादामुनी होते. त्यांना अर्थात गाणं येत होतं. माझे वडील मागे पडले. पण आज वडिलांचं स्वप्न मी पूर्ण करू शकलो याचं समाधान आहे. विजूमामा मनापासून बोलत होते.

लगेचच मावशीचा विषय निघाला. लक्ष्मीकांत बेर्डे माझा चांगला मित्र. त्याच्याबरोबर माझं पहिलं नाटक ‘टुरटुर’ केलं. खरे पाहता मावशीची ऑफर त्याला होती. पण तो खूप व्यस्त झाला होता. त्याने सांगितलं मावशी माझ्यापेक्षा विजय जास्त चांगला साकारू शकेल. कोल्हटकर म्हणाले, विजय काम चांगलं करेल यात शंका नाही. पण तो चांगला दिसेल का? आणि मला बघताक्षणी कोल्हटकरांनी होकार दिला. मावशीच्या तालमी सुरू झाल्या.

विजयाबाईंचा प्रभाव

याआधी विजूमामांनी ‘टुरटुर’नंतर ‘हयवदन’ नाटक केले होते. बाईंच्या अर्थात विजया मेहतांच्या दिग्दर्शनाखाली… बाईंबद्दल विजूमामा भरभरून बोलले. विजयाबाईंच्या हाताखाली मला आयुष्यभर पुरेल इतके शिकायला मिळाले. जे मला अजूनही पुरते आहे. नाटकांच्या तालमींसाठी असणारे वेळेचे महत्त्व मला बाईंनी शिकवले. वेळ पाळण्याची ही सवय मला आजतागायत उपयोगी पडते आहे. केवळ नाटकाच्या बाबतीतच नव्हे, तर चित्रपटसृष्टीतही मी वेळ कधी चुकवली नाही. चित्रपट करताना आमची सकाळची ९ ची शिफ्ट असायची. मेकअप करून मी पावणेनऊला सेटवर हजर असायचो. बाकीचे अभिनेते नऊच्या शिफ्टला दोन वाजता हजर व्हायचे. पण मी अजूनही वेळ कधीच चुकवू शकत नाही. दिवसभर चित्रपटाचे चित्रीकरण करायचो आणि रात्री मावशीचा प्रयोग.

टांग टिंग टिंगा

गाडी पुन्हा मावशीकडे वळली. विजयाबाईंच्या तालमीचा ‘मोरूच्या मावशी’साठी खरोखरच खूप उपयोग झाला. विजयाबाई एखाद्या व्यक्तिरेखेत आम्हा कलाकारांना अगदी सहज आणून सोडून देतात. मग ती व्यक्तिरेखा आमची. तोच प्रत्यय मी मावशीच्या बाबतीत घेत होतो. दिलीपने मावशी माझ्यावर अक्षरशः सोपवली होती. त्यावेळी नाटकासाठी वेगळा नृत्यदिग्दर्शक वगैरे प्रकार फारसा प्रचलित नव्हता. ‘टांग टिंग टिंगा’चे नृत्य हे माझ्या स्वयंस्फूर्तीतूनच आले आहे. विजूमामा उत्साहात सांगत होते. मावशीचा ‘टांग टिंग टिंगा’ हा नाच आणि गाणं म्हणजे या नाटकाचा आत्मा. झळाळती रेशमी साडी लीलया सावरत तिने घातलेला पिंगा आणि कोंबडा कधीही न विसरता येणारा… या नाचासाठी वन्समोअर ठरलेला… आणि मावशी चक्क दोन वन्समोअर घेऊन तितक्याच ऊर्जेने पिंगा आणि कोंबडा घालायची. विजूमामा मावशीच्या आठवणीत पुरते रमले होते. पुढे त्यांना ‘वासूची सासू’चीही ऑफर आली. त्यावर प्रांजळपणे विजूमामांनी सांगितले की, माझ्याकडे जे काही म्हणून होते ते मी संपूर्णपणे मावशीत घातले आहे. त्यामुळे आता त्याहून वेगळे मी काही करू शकणार नाही, असे सांगत त्यांनी त्या ऑफरला नम्रपणे नकार दिला.

नाटक, चित्रपट, मालिका तिन्ही क्षेत्रे विजूमामांना सारखीच आवडतात. नाटकाची कडक शिस्त संपूर्ण आयुष्यभर उपयोगी पडते. चित्रपटांतही त्याचा उपयोग होतो. नुकतेच महेश कोठारेंनी नव्या चित्रपटाचे बोलणे केले आहे… आणि मीही त्यावर विचार करतो आहे. विजूमामांनी उत्साहात सांगितले. हिंदी चित्रपटात कधी जावेसे वाटले नाही. निळूभाऊ अर्थात निळू फुलेंना हिंदी चित्रपटासाठी केवळ वेळ पाळण्याच्या शिस्तीवरून दिलीपकुमारसारख्या दिग्गज अभिनेत्याला नकार देताना मी पाहिले होते. ते माझ्या मनावर कायमचे कोरले गेले… आणि मलाही त्याचा कधी मोह झाला नाही. मुळात आम्ही नाटकवाली माणसं. यातच रमलो आणि रंगदेवतेनेही आम्हाला भरभरून दिले.

आजच्या विनोदावर भाष्य करताना विजूमामा म्हणाले, विनोद हा निखळ आनंद देणारा असावा. आपल्या आईवडिलांबरोबर त्यावर सहजपणे बोलता आले पाहिजे. तो कंबरेखालचा नसावा.

थोडेसे आजारी असले तरी विजूमामांचा सळसळता उत्साह बोलताना लपत नाही. ‘अरे मला नॉनव्हेज प्रचंड आवडते. अगदी माणूससुद्धा खाईन’ आम्ही दोघंही यावर मनमुराद हसलो. घरात काकूंचा छानसा वावर घराच्या प्रसन्नतेत भर घालत होता. पुरस्काराची तृप्ती, समाधान दोघांच्याही मनभर पसरले होते… आणि नवं काहीतरी करण्याची ऊर्मी विजूमामांमध्ये नवी ऊर्जा देत होती.

विजयाबाईंनी सांगितलेली एक गोष्ट मला राहून राहून आठवत होती. एका निर्जन बेटावर दोन वाटसरू अडकतात. अर्थात जहाजाच्या फेऱ्या तिथे होत असतात. फक्त दोन फेऱ्यांमधील वेळेचे अंतर खूप जास्त असते. त्यातील एकजण सुतारकाम करणारा असतो. भवताली भरपूर लाकडं पडलेली असतात. तो मनाशी म्हणतो, वा… वेळेचा सदुपयोग करूया. तो भरपूर लाकडं गोळा करतो आणि त्याच्या खुर्च्या तयार करतो. एकसारख्या, एका मापाच्या… दुसरा काष्ट शिल्पकार असतो. तो एक लाकडाचा ओंडका उचलतो आणि त्यावर काम करीत बसतो. सुतारकाम करणारा त्याला हसत असतो. कितीवेळ एकाच लाकडाच्या ओंडक्यावर काम करत राहिला म्हणून… पुढे दोघंही परततात. सुताराच्या खुर्च्यांना ठरावीक मोबदला मिळतो… आणि काष्ट शिल्पकाराचे शिल्प मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाची कलाकृती होते. बाईंची ही गोष्ट त्यांचेच संस्कार भिनवून घेतलेल्या विजूमामांशी खूप साधर्म्य दाखवणारी मला वाटली. विजूमामांनी फक्त मावशी केली… आणि त्यात आपले तन मन अर्पून तिला एका अनोख्या उंचीवर पोहोचवले…

moruchi-mavshi-ut-photo
विजूमामांकडे त्यांचे आणि मावशीचे एकत्रित असे नितांत देखणे छायाचित्र आहे. त्याविषयी त्यांनी सांगितले की या छायाचित्राची आठवण खूप खास आहे. हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेले छायाचित्र आहे. आमचे नाटक पाहून ते खूप खूश झाले… आणि हे छायाचित्र काढून मला भेट म्हणून दिले. अतिशय अमूल्य अशी ही भेट आहे.