देशात पुन्हा लॉकडाऊन लावण्याची गरज नाही; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

1149

देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 9,36,181 वर पोहचला आहे. गेल्या चार दिवसांपासून देशभरात दररोज 25 हजारापेक्षा जास्त नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. देशभरात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चर्चांना आरोग्य मंत्रालयाने पूर्णविराम दिला आहे. देशात पुन्हा लॉकडाऊन लावण्याची गरज नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच देशभरात पुन्हा लॉकडाऊन जारी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशभरात कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढत असले तरी सध्या लॉकडाऊन जारी करण्याची गरज नाही. विविध राज्यातील कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रीत करून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तसेच राज्यातील एखाद्या शहरात, गावात, परिसरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असल्यास तेथे लॉकडाऊन जारी करण्याचे अधिकार राज्यांना असल्याचे राजेश भूषण यांनी स्पष्ट केले. मध्य प्रदेशमध्ये रविवार, उत्तर प्रदेशमध्ये शनिवार, रविवारी लॉकडाऊन करण्याबाबत विचार सुरू आहे. महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, नवी मुंबई यासारख्या शहरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या लॉकडाऊनला प्राधान्य देत कोरोनाचा फैलाव रोखण्यात येत आहे. मात्र, सध्या देशभरात लॉकडाऊन जारी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊनचे अनेक दुष्परिणाम आहेत. उद्योगधंदे आणि रोजगार यासह सर्वच व्यवहार ठप्प होतात. त्यामुळे याआधी झालेल्या चुका आणि त्रुटी टाळून लॉकडाऊनऐवजी इतर पर्याय शोधावे लागतील. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एखादा परिसर, शहर, गाव लॉकडाऊन करण्याचे अधिकार राज्यांना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही भागातच कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने योजना आखून यावर काम करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या