आरोग्य यंत्रणेने डॉक्टर मुन्नाभाईला पकडले, कायद्याचा आधार घेत अवघ्या 2 तासात सुटका

>> प्रसाद नायगावकर

सरकारने बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कारवाई केलीय. पण तरीही बोगस डॉक्टरांनी गोरखधंदा मांडल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. पण कायद्याच्या पळवाटा शोधत असले डॉक्टर मुन्नाभाई अवघ्या काही तासात बाहेर येतात.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील दुर्गम भागातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येत असलेल्या बोरगाव पुंजी येथे बोगस डॉक्टरने आपले दुकान थाटले होते. त्याच्यावर मंगळवारी धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. कोलकत्ता येथून आलेल्या युवकाने डॉक्टर बनून गरिब ग्रामीण रुग्णांवर उपचार करणे सुरू केले. त्याच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून कारवाई केली. त्याच्या जवळून 11 हजार रुपयांची औषधी जप्त केली. घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. ही कारवाई करण्यात संपूर्ण दिवस गेला. आरोपी असलेल्या युवकाला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर काही तासातच सुचना पत्र देवून सोडून देण्यात आले.

बोरगाव पुंजी येथे अनाधिकृत वैद्यकीय व्यावसा करत असलेल्या मिथुन बिस्वास यांचेवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी भांबोरा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी शुभम संजय वाडेवाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक शोधुन कार्यवाही करण्यासाठी विस्तार अधिकारी अरुण खांडरे, अन्न निरीक्षक संजय मोहनसिंग राठोड, डॉ. धर्मेश चव्हाण यांच्या पथकाने बोरगाव पुंजी येथील वार्ड क्रं.1 मध्ये अनधिकृत वैदयकिय व्यवसाय करणारा मिथुन बिश्वास याच्याकडे छापा टाकला. तो मुळ राहणार पश्चीम बंगालचा असून महाराष्ट्र राज्य वैद्यकिय व्यवसायीक म्हणुन नोंदणी करावयाचे कागदपत्र आढळुन आलेले नाही. त्यामुळे कारवाई करत सदर बोगस डॉक्टरला ताब्यात घेवून घाटंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र काही वेळानंतर या डॉक्टरची लगेच सुटका करण्यात आली. कायदातील तरतूदीनूसार या गुन्हा केवळ दोन वर्षाची शिक्षा असल्याने त्या बोगस डॉक्टरला सुचना पत्र देवून सोडून दिले आहे.