
आपल्यापैकी अनेक जण वेदना दूर करण्यासाठी डोकेदुखी, अंगदुखी, दाढदुखीवर पेनकिलर गोळी घेतात. पेनकिलर वेदनेवर तात्पुरते काम करत असले तरी त्याचे साईड इफेक्ट्सही लक्षात घेतले पाहिजेत. पेनकिलरच्या अतिवापरामुळे किडनी, हृदयरोगाच्या धोक्यासह अॅसिटिडी, एलर्जीसारख्या गंभीर आजाराची जोखीम असल्याचे निरीक्षण तज्ञांनी नोंदवले आहे.
पॅरासिटामॉल, बुफेन, ऑस्पिरिन, डिस्प्रिन, झुपर, क्रोसीन, कोम्बिफ्लेम, सॅरिडॉन अशा औषधांची नावे लोकांना तोंडपाठ असतात. काही वेदनाशामक औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय देण्याची मुभा आहे. मात्र काही घातक वेदनाशामक औषधे आहेत. काही पेनकिलरची विक्री (ओटीसी) करण्यास परवानगी आहे.
डॉक्टरकडे न जाता ऊठसूट मेडिकल स्टोअरमधून गोळ्या आणून खाणे तब्येतीवर गंभीर परिणाम करू शकते. पेनकिलर्स गोळ्यांमुळे तीव्र झोप येणे, अन्न नकोसे वाटणे, उलटी येईल असे वाटणे, मन एकाग्र न होणे, बद्धकोष्ठता, वजन कमी होणे, शरीर सुस्तावणे, नैराश्य अशी तात्पुरती लक्षणे आहेत. याशिवाय विशिष्ट गोळ्यांचे व्यसन लागणे, किडनीवर परिणाम होणे असे कायमस्वरूपी दुष्परिणाम होतात, अशी माहिती तज्ञ डॉक्टरांनी दिली. नागपूरचे डॉ. प्रवीण शिंगाडे म्हणाले, काही वेळेला प्रिस्क्रिप्शनशिवाय रुग्ण सेल्फमेडिकेशनचा वापर करतात. मात्र सेल्फमेडिकेशन जिवावर बेतणारे ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. पेनकिलरची गरज असलेल्या रुग्णाला साईड इफेक्ट होऊ नये म्हणून इतरही गोळ्या डॉक्टर देतात.



























































