हिंगोली बसस्थानकावर हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली बसस्थानकावर सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील रामभाऊ कृष्णाजी मानमोठे (68) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी दीड वाजता घडली.

सेनगाव तालुक्यातील ताकतोडा या गावातील रामभाऊ कृष्णाजी मानमोडे हे रिसोड येथे उपचारासाठी दवाखान्यात जाण्याकरिता हिंगोलीच्या बसस्थानकावर आले होते. एम. एच. 14 बीटी 3034 या क्रमांकाची हिंगोली ते रिसोड बस फलाटावर लागलेली असताना मानमोठे हे या बसमध्ये चढण्याच्या तयारीत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटून हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ही माहिती समजल्यावर हिंगोली शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी मानमोठे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मानमोठे यांना मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याचे सांगितले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

इंदिरा चौकात आढळला अनोळखी मृतदेह
हिंगोली शहरातील इंदिरा चौक येथे एका 65 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज दुपारी तीन वाजता उघडकीस आली. दरम्यान, या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आल्याचे तसेच मयत इसमाचे नाव अद्याप माहिती झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.