
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
मागील आठवडाभरापासून एकाच जागी ठिय्या मांडलेला मान्सून आता सर्वदूर पसरणार आहे. वातावरणाची अनुकूलता नसल्याने नैऋत्य मोसमी पावसाची म्हणजे मान्सूनची वाटचाल रखडली होती. कोकणात सध्या तुफानी कोसळणारा पाऊस शुक्रवारपासून वेगाने उर्वरित महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांकडेही सरकणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. ‘स्कायमेट’ या हवामान संस्थेनेही हा अंदाज वर्तवला आहे.
मान्सूनसाठी लागणारे पोषक काताकरण तयार झाले असून उर्वरित महाराष्ट्र, आसाम, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये पावसाची दमदार एण्ट्री होईल असा अंदाज आहे. सध्या केरळ किनारपट्टीपासून ते महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस येण्याचा अंदाज आहे.
आठवडाभराचा अंदाज
*२२ जून- कोकण, गोव्यात मुसळधार. महाराष्ट्रासह असाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, केरळ व कर्नाटक किनारपट्टीवर पावसाची शक्यता.
*२३ जून – आसाम, मेघालय, कोकण आणि गोव्यात मुसळधार. हिमाचल, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश, नागालंड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, कर्नाटक किनारपट्टीवर पाऊस.
*२४ जून – कोंकण व गोव्यात मुसळधार पाऊस. बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय व कर्नाटक किनाऱयावर जोरदार पावसाची शक्यता.
*२५ जून -कोकण, गोव्यात मुसळधार. बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक किनाऱयावर पावसाचा अंदाज.



























































