पावसाचे आतापर्यंत एकूण 101 बळी, 24 तासांत राज्यात 4 मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात गेल्या चोवीस तासात पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी शहरातल्या अनेक भागात पाणी साचले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण विभागात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली असून राज्यभरात गेल्या 1 जूनपासून आतापर्यंत विविध दुर्घटना घडून पावसामुळे 101 जणांचा बळी गेला आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. 1 जूनपासून 28 जुलैपर्यंत गडचिरोली, रायगड, रत्नागिरी नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या चोवीस तासांत ठाणे, चंद्रपूर, रत्नागिरी, गडचिरोली, मुंबई उपनगर, नांदेड, यवतमाळ, नागपूर या भागात सर्वाधिक पाऊस पडला. राज्यात पावसामुळे विविध दुर्घटना घडून आतापर्यंत 101 जणांचा मृत्यू झाला असून गेल्या चोवीस तासांत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापपर्यंत 13 जण बेपत्ता असल्याचं वृत्त आहे.

सगळ्यात जास्त मृत्यू कुठल्या भागात

1 जूनपासून 28 जुलैपर्यंत कोकण विभागात दरड कोसळून, झाड पडून, पूर, वीज तसेच भिंत कोसळल्यामुळे अनेक लोकांचा जीव गेला आहे. कोकण विभागात आतापर्यंत 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागात 2 जणांचा मृत्यू झाला आहे, नाशिक विभागात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5, अमरावतीमध्ये 16 तर नागपूरमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पावसामुळे सर्वाधिक मृत्यू कोकण विभागात झाले आहेत.

या विभागांना हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’

29 ते 30 जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार असून यलो अलर्ट जारी केला. रायगड जिल्ह्यात 30 आणि 31 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 29, 30 आणि 31 जुलै, सिंधुदुर्गात उद्या 29 जुलै, पुणे जिल्ह्यात 30 आणि 31 जुलै, कोल्हापूर जिल्ह्यात उद्या 29 जुलै, सातारा जिल्ह्यात 29 आणि 30 जुलै मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अकोला जिल्ह्यात 29 आणि 30 जुलै रोजी, अमरावती 29, 30 आणि 31 जुलै रोजी, भंडारा 29, 30 आणि 31, बुलढाणा 29 आणि 30 जुलै रोजी, चंद्रपूर 29 आणि 30 जुलै, गडचिरोली 29, 30 आणि 31 जुलै रोजी, गोंदिया जिल्ह्यात 29, 30 आणि 31 जुलै, नागपूर 29, 30 आणि 31 जुलै, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ येथे 29 आणि 30 जुलै रोजी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन मुसळधार पाऊस पडणार असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.