नांदेड शहर व जिल्ह्याला काल रात्री तब्बल तीन तास पावसाने झोडपले. जिल्ह्यातील आठ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून नांदेड शहरातही या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. दरम्यान शिवमहापुराण कथास्थळी २० एकर जागेत पाणीच पाणी झाल्याने भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रशासनाने रात्रभर जागून या सर्वांना सुरक्षितस्थळी हलविले.
नांदेड शहर आणि जिल्ह्याला काल रात्री पावसाने झोडपले. गेली आठ दिवस उकाड्याने त्रस्त असलेल्या नांदेडकरांना या पावसाने दिलासा मिळाला असला तरी सखल भागात साचलेले पाणी, अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांची होणारी कसरत, नालेसफाईचा बोजवारा उडाल्याने नागरिकांची झालेली तारांबळ यामुळे नांदेडकर मंडळीची धावपळ उडाली. नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहर, लिंबगाव, मुखेड, जांब, कुरुळा, पेठवडज, बारुळ, दिग्रस या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली असून, लिंबगाव सर्कलमध्ये सर्वाधिक ११६.५० मि.मी.पाऊस झाल्याने तेथील शेतामध्ये पाणी साचले आहे. यावेळी पिकांची परिस्थिती सुधारत असताना अचानक आलेल्या पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील वसंतनगर, देगलूर नाका, श्रावस्तीनगर, मिलगेट एरिया, आनंदनगर आदी भागात रस्त्यावर पाणी साचले होते. विष्णूनगर, गोकुळनगर भागात नालेसफाईचे तीनतेरा झाल्याने या भागात अनेक घरामध्ये पाणी शिरले.
दरम्यान कौठा भागात सुरु असलेल्या पं.प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेच्या भागात सर्वत्र पाणी साचले. कालच्या कथेचा कार्यक्रम पाच वाजता संपल्यानंतर अनेक भाविकांनी आपली जागा सुरक्षित राहवी म्हणून त्याचठिकाणी मुक्काम केला होता. मात्र रात्री झालेल्या पावसाने या ठिकाणी जवळपास मंडपात एक ते दीड फुट पाणी साचले होते.
नांदेडच्या विष्णूपुरी प्रकल्पात ९० टक्के पाणीसाठा झाल्याने तसेच वरच्या भागातून पाण्याची आवक वाढल्याने आज दुपारी या प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीच्या विष्णूपुरी प्रकल्पाच्या खालच्या बाजूस असणार्या सर्व गावातील नागरिकांनी, शेतकर्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
कुंडलवाडी-गेल्या अनेक दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने दि.२३ आँगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. दिवसभर उन्हाने घामाघूम झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला.
२३ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. नंतर रात्री उशिरापर्यंत पाऊस पडल्याने शहरात सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.
मुखेड-मुखेड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होऊन हातातोंडाशी आलेले पिके निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
शुक्रवारी रात्री मुखेड व परिसरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस व जवळपास सर्वच लागवडीचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच शेतातील बांध, कालवे फुटून शेतीची नुकसान झाली आहे. शेतकर्यांचे झालेले नुकसान बघून प्रशासनाने शेतीचे पंचनामे करून तात्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.