परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रात 28 बळी

परतीच्या मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा, पुणे या चार जिल्हय़ात गेल्या तीन दिवसात 28 जणांचा बळी घेतला असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या सोलापुर जिल्हय़ातील 58 हजार हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले. श्री क्षेत्र पंढरपुरात चंद्रभागा नदीने रौद्ररूप धारण केल्याने रस्त्यांवर होडय़ा सुरू आहेत. पाऊस आणि धरणांमधील पाण्याचा विसर्ग यामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले. हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

काय आहे स्थिती?
सोलापूर – सोलापूर जिल्हय़ात सर्वच तालुक्यांना अतिवृष्टी आणि पुराचा जबर फटका बसला. जिल्हय़ातील 623 गावे बाधित 8555 घरांमध्ये पाणी शिरले. 32 हजार 521 नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविले. पंढरपुरातील सात बळींसह जिल्हय़ात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जनावरांचा मृत्यू झाला. सोलापूर-विजापूर महामार्गासह 214 रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत.

पंढरपूर – उजनी धरणातून 2 लाख 32 हजार आणि वीर धरणातून 53 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग बुधवारी सोडण्यात आला होता. यामुळे गुरूवारी सायंकाळपासून चंद्रभागेला रौद्ररूप आले असून, रस्ते पाण्यात बुडाले. घरांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेले. रस्त्यांवर होडय़ा चालत आहेत. आतापर्यंत पंढरपूर शहर आणि परिसरातील गावांमधील 11 हजारांवर नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविले. एनडीआरएफचे चार पथकांकडून नागरिकांची सुटका करण्यात येत आहे.

सातारा – सातारा जिल्हय़ात 1 हजार 420 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. माण तालुक्यात पावसाचा हाहाकार उडाला. मान गंगेचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. अनेक पुल पाण्याखाली गेल्याने रस्ते वाहतूक बंद आहे. खटाव तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरूणाचा मृत्यू झाला.

सांगली – हातातोंडाशी आलेली पिके उद्धवस्त करून नागरी वस्तीत दाणादाण उडवून पावसाने शुक्रवारी विश्रांती घेतली. शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी 32 फुटांवर स्थिरावली होती. दरम्यान, तीन हजारांवर घरात पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले. नद्यांना पुर आल्याने आतापर्यंत वाहून गेलेल्या आठ जणांचा मृत्यू झाला.

पुणे – परतीच्या पावसाने पुणे जिल्हय़ात बारामती, इंदापूर, भिगवण, मावळ तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दौंड तालुक्यातील राजेगाव येथील तीन तरूण वाहून गेले होते. त्यांचा मृत्यू झाला आहे.

मराठवाडय़ाच्या नशिबी कोरडा नाहीतर ओला दुष्काळ कायम
कायम दुष्काळाशी दोन हात करणाऱया मराठवाडय़ाला यंदा पावसाने हिरवे स्वप्न दाखवले होते. मात्र परतीच्या प्रवासात पावसाने घात केला. चार दिवसांत झालेल्या राक्षसी पावसाने तब्बल 35 लाख हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, ऊसासह इतर पिके नेस्तनाबूत झाली आहेत. हा प्राथमिक अंदाज असून नुकसान यापेक्षाही जास्त असू शकते असे प्रशासनाचे म्हणणे आहे. निसर्गाच्या या कोपामुळे शेतकरी मात्र उद्ध्वस्त झाला आहे.

हिरव्यागार शिवाराला परतीच्या पावसाची नजर लागली. पावसाने मराठवाडय़ात धूमशान केले. काढणीला आलेल्या सोयाबीनची माती झाली. शेतात गुडघाभर पाणी साचले. पावसाचा जोरच एवढा भयंकर होता की कापसाची बोंडे गळून पडली. नकदी पिके हातची गेल्याने शेतकरी रस्त्यावरच आला. जून ते सप्टेंबर महिना या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने 2000 गावांतील 10 ते 12 लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे, याचा फटका 5 लाख 50 हजार शेतकऱयांना बसला आहे. या संबधीचा अहवाल राज्य शासनाला पाठवण्यापूर्वीच विभागात परतीच्या पावसाने कहर केला. लातूर, धाराशिव जिल्हय़ाला अतिवृष्टीचा प्रचंड फटका बसला. उर्वरित मराठवाडय़ातही या पावसाने शेतकऱयांची दाणादाण उडवली.

केंद्राने महाराष्ट्राला भरीव मदत द्यावी
परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, धाराशीव, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला आहे. अतिवृष्टीने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले असून या नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱयांचा पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज दिली. शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल. शेतकऱयांच्या मदतीसाठी केंद्र सरकारनेही भरीव आर्थिक मदत करावी , अशी मागणीही थोरात यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या