मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाची भिंत ढासळली

826

देवगड तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग किल्ल्याची महत्त्वाची भिंत ढासळली आहे. गावाच्या दिशेने असलेल्या या बुरुजाची तळाची बाजू ढासळल्याने आता वरचा बुरूज धोकेदायक झाला असून तो केव्हाही कोसळू शकतो.

या बुरुजाला संरक्षण देण्यासाठी ही भिंत उभारण्यात आली होती. मात्र ही भिंत कोसळली असल्याने या शिवकालीन किल्ल्याला धोका पोहोचणार आहे. ही माहिती किल्यावर वरील कर्मचारी रामदास, आणि साशंक शिरवाडकर यांनी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्याना दिली आहे. यापूर्वीच समुद्रातील एक बुरूज खालून पोखरला असल्याने या बुरुजाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू आहे. यातच हा नवीन बुरुज ढासळल्याने या किल्ल्याच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हिंदवी स्वराज्याचे सरखेल कान्होजी आंग्रे यांचीही दक्षिणेकडील आरमारी राजधानी होती. या किल्ल्याने तब्बल 13 घनघोर युद्ध पाहिली आहेत. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 225 किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटरवर आहे. सुमारे 17 एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या