आंबोलीत धुवांधार पाऊस; आजऱ्याचा व्हिक्टोरिया पूल वाहतुकीसाठी बंद

527

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत आंबोली आणि आजरा परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. आंबोलीत गेल्या 24 तासात सुमारे 350 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे येथील हिरण्यकेशी उगमापासूनच नदीला पूर आल्याने नजीकच्या गावात पाणी शिरले आहे. तर आजरा परिसरातील हिरण्यकेशी नदीची बुधवारी सायंकाळी मच्छिन्द्री झाली आहे. त्यामुळे या पुलावरून कोकण, गोव्यासह अलीकडील कोल्हापूर, कर्नाटक वाहतूक थांबविण्यासाठी पुलाजवळ नाकाबंदी केल्याचे तहसीलदार विकास अहिर व सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी स्पष्ट केले.

आंबोलीतील धुवांधार पावसाने घाटमार्गात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याचे वृत्त आहे. पोलीस व बांधकाम विभागाने त्या ठिकाणी मदतकार्य करून रस्ता वाहतुकीस मोकळा केला आहे. मात्र, परिसरातील कावळेसाद प्रयत्न क्षेत्राकडील रस्त्यांवर पुराचे पाणी आले आहे. आजरा मार्गावरही झाडे कोसळल्याने व पुराचे पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. आजरा परिसरातही पावसाची मुसळधार सुरुच आहे. मंगळवारी हिरण्यकेशी नदीवरील साळगाव तर बुधवारी सरोळी बंधाराही पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक ठप्प झाली. मंगळवारी दिवसभरात 112 मिमी तर बुधवारी दिवसभरात 166 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आंबोली आणि आजऱ्यातील अतिवृष्टीने हिरण्यकेशी नदीचे पात्र भरुन वाहू लागले आहे. या नदीवरील ऐतिहासिक व्हिक्टोरिया पुलाची सायंकाळी मच्छिन्द्री झाली. गेल्या वर्षानंतर आता सलग दुसऱ्यांदा मच्छिन्द्री झाली आहे. हा धोक्याचा इशारा समजून प्रशासनाने तातडीने येथील वाहतूक बंद केली आहे. त्यानुसार या पुलावर बॅरिकेट्स टाकून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या