जालन्यात अतिवृष्टीने कपाशीची बोंडे पडली काळी; पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीप हंगामातील मूग,उडीद, तूर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ आता सोयाबीन व कपाशीचे बोंडे काळी पडू लागल्याने शेतकरी संकटात सापडला असून पिके वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. पावसाच्या दमदार हजेरीने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची लागवड जोमात केली होती.

लॉकडाऊनच्या काळात हातात पैसा नसल्याने अनेकांनी घरातील दागिने विकून आणि सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन खरीप हंगामावर खर्च केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मूग, उडीद पिके हातातून गेली आहेत. त्याचप्रमाणे ऊसही आडवा झाला आहे. कपाशी पिकावर किडीचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने पाने करपू लागली आहेत. थोडे फार नुकसान सहन करून शेतकरी पीक वाचवण्यासाठी धडपड करत होता. त्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करण्यात आली होती.

पाऊस सुरूच असल्याने नगदी पीक म्हणून समजले जाणारे कपाशी पीक लाल पडून बोंडे काळी पडू लागल्याने शेतकरी हताश झाला आहे. पिकावर केलेला खर्चही निघणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर्षीही शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे मूग, उडीद शेतकऱ्यांच्या हातातून पूर्णपणे गेले आहे. शासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र, नुकसानभरपाई केव्हा पदरात पडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

आपली प्रतिक्रिया द्या