
संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील सोमेश्वर मंदिरा नजीक असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडांना रविवारी रात्रभर आणि सोमवारी सकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने पूर्णता वेढल्याचे पाहायला मिळाले. पुराचे पाणी गरम पाण्याच्या कुंडांच्या इमारती भोवती चारही बाजूने गोल गोल फिरत होते.
संगमेश्वर नजीकच्या राजवाडी येथील गरम पाण्याची कुंडे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखली जातात. या कुंडांच्या जवळच पुरातन सोमेश्वर मंदिर असून येथील कास्टकला पाहण्यासाठी पर्यटक या मंदिराला भेट देत असतात. येथील गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्यास त्वचारोग निघून जातात, असा अनेकांचा अनुभव आहे. परिणामी अनेक पर्यटक सोमेश्वर मंदिराला भेट देण्यापूर्वी येथील गरम पाण्याच्या कुंडात स्नान करतात. राजवाड येथील स्थानिक ग्रामस्थ दररोज सखा सायंकाळ येथील गरम पाण्याच्या कुंडावर जाऊनच स्नान करत असतात.
रविवारी रात्रभर कोसळलेल्या पावसाने विश्रांती न घेता सोमवारी सकाळपासून बरसने सुरूच ठेवल्याने संगमेश्वर तालुक्याच्या विविध भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. राजवाडीच्या गरम पाण्याच्या कुंडा नजीक असणाऱ्या मोठ्या ओढ्याला पूर आला आणि या पुराचे पाणी कुंडाच्या इमारतीच्या चारही बाजूने गोल गोल फिरत असल्याचे पाहायला मिळाले. परिणामी गरम पाण्याच्या कुंडाकडे जाणारा मार्ग बंद झाला होता.




























































