शारदीय नवरात्रौत्सवात जिल्ह्यात सर्वत्र मांगल्य आणि चैतन्याचा वर्षाव सुरु असताना,कालपासून ढगांच्या गडगडाटासह परतीच्या पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या आहेत.आज सलग दुसऱ्या दिवशीही ढगांच्या गडगडाटात आलेल्या पावसाने,करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात भाविकांची तारांबळ उडाली.दररोज लाखोंच्या संख्येने होत असलेल्या गर्दीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. नवरात्रोत्सवात एरव्ही पाय ठेवायलाही जागा नसते,पण पावसामुळे काही काळ परिसर ओस पडल्याचे दोन दिवस पहायला मिळत आहे.
दरम्यान नवरात्रोत्सवात आज दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात जागर आहे.श्रीजोतिबाचा जागर झाल्याशिवाय इतर देवतांचा जागर होत नसल्याची परंपरा आहे.यंदा अष्टमी दिवशी म्हणजे आज गुरुवारी श्रीजोतिबा मंदिरात जागर होत आहे.तर अष्टमी निमित्त करवीर निवासिनी श्रीअंबाबाई देवीची नगरप्रदक्षिणा होणार आहे.
काल बुधवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली.तर आज दुसऱ्या दिवशीही दुपारी दोन नंतर ढगांच्या गडगडाटासह परतीच्या पावसाने झोडपण्यास सुरुवात केली.देवस्थान समिती ने दर्शनरांग मंडप तसेच रामाच्या पाराजवळील दर्शन रांग पुलावर पत्र्याचे शेड घातल्याने,या रांगेतील भाविकांची गैरसोय झाली नाही.पण मंदिराच्या आवारातील इतर भाविकांना पावसापासून बचाव करण्यासाठी पोलीस व वैद्यकीय मदत कक्ष तसेच दर्शनरांग मंडपाचा आधार घ्यावा लागला.मंदिराचा दक्षिण दरवाजा आणि उत्तर दरवाजाबाहेरील श्रीजोतिबा रोड तसेच भवानी मंडपात रस्त्यावर पाणी साठल्याने त्यातून वाट काढत भाविकांना जावे लागत होते.अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची आजही धावपळ झाली.
श्रीअंबाबाई मंदिरात दररोज लाखोंच्या संख्येने भाविक
गुरूवार,दि.३ ऑक्टोबर पासून घटस्थापनेने नवरात्रोत्सवास सुरुवात झाली.पहिल्याच दिवशी 1 लाख 34 हजार 466 भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे.तर दुसऱ्या दिवशी 1 लाख 67 हजार 238, तिसऱ्या दिवशी 1 लाख 68 हजार 274 चौथ्या दिवशी रविवारी सुट्टीमुळे तब्बल 2 लाख 74 हजार 347 भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.तर पाचव्या दिवशी 1 लाख 37 हजार 827, सहाव्या दिवशी 1 लाख 76 हजार 356 आणि काल बुधवारी सातव्या दिवशी 79 हजार 263 भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
श्रीजोतिबा डोंगरावर यंदा अष्टमीला जागर, मंदिर रात्रभर खुले
गुरुवार,दि 19 ऑक्टोबर रोजी जोतिबाचा जागर सोहळा झाला.जागरादिवशी श्रीजोतिबास तेल वाहणे, कडाकणी,ऊस व गुलाल दवणा,श्रीफळ अर्पण करून फराळाचे नैवेद्य दाखवण्याची,विविध धार्मिक सोहळे ब मंत्रपठणाबरोबरच विविध मानपानांची प्रथा आहे. दरवर्षी परंपरेनुसार जोतिबाचा जागर सप्तमीला असतों.यंदा आठव्या दिवशी जागर सोहळा आला आहे.या दिवशी श्रींची कमळ पुष्पातील बैठी महापूजा बांधली जाते.पुजेसमोर अश्व अर्पण करून महापूजा बांधली जाते.यावेळी नारळ, सिताफळ, खोबरे वाटी, कवडाळांचे तोरण बांधण्याचा विधी झाला. जोतिबाच्या जागराचे वैशिष्ट्य म्हणजे जोतिबाचा जागर झाल्याशिवाय इतर कोणत्याही देवाचा जागर होत नाही. या दिवशी मंदिर रात्रभर खुले राहते.