
गेल्या आठवडय़ापासून जिह्यात पावसाने हजेरी लावली असून, गेल्या 24 तासांपासून ठिकठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस कोसळत आहे. आज सकाळपासून दिवसभर संततधार पावसाने कोल्हापूरकरांची दैना उडवली होती. सततच्या पावसाने दिवसभरात राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले असून, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत साडेतीन फुटांची वाढ झाली, तर दहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, 13 सप्टेंबरपर्यंत जिह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिह्यावर ओढवलेले महापुराचे संकट यंदा दुसऱयांदा टळले. त्यामुळे गणेशोत्सवही निर्बंधमुक्त वातावरणात धुमधडाक्यात साजरा झाला, पण गेल्या आठवडय़ापासून जिह्यात पावसाने हजेरी लावली. काही वेळा ढगफुटीसदृश पावसाने झोडपले होते. आता तर काल सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीवरही पावसाचा परिणाम झाला. आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने झोडपण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. अनेक सखल भागात पाणी साचले असून, ओढय़ा-नाल्यांतील पाणी ओसंडून वाहू लागले आहे.
शहरालगतचा कळंबा तलावही पुन्हा सांडव्यावरून वाहू लागला आहे. पंचगंगा नदीवरील कसबा बावडा येथील राजाराम बंधारा यंदा पावसामुळे चौथ्यांदा पाण्याखाली गेला आहे. सकाळी 14 फुटांवर असलेली पंचगंगेची पातळी सायंकाळी सहाच्या सुमारास 17.8 फूट झाली होती. पावसाचा वाढता जोर आणि विविध धरणांतून वाढलेला विसर्ग पाहता नद्यांच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस कोसळत असून, राधानगरीसह तुळशी, कुंभी, पाटगाव, चित्री, चिकोत्रा, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, कोदे अशी जिह्यातील एकूण 10हून अधिक धरणे शंभर टक्के भरली आहेत. बहुतांश सर्वच धरणांतून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज सकाळी अकरा ते दीडपर्यंत राधानगरी धरणाचे एकूण तीन स्वयंचलित दरवाजे उघडले असून, त्यातून 4 हजार 284, तर पॉवर हाऊसमधून 1 हजार 600 असा एकूण 5 हजार 884 क्युसेक विसर्ग सुरू होता. कर्नाटकातील पूर्ण क्षमतेने भरलेल्या अलमट्टी धरणातूनही 52 हजार 500 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. हिप्परगीचा विसर्ग सध्या बंद आहे.



























































