
सामना प्रतिनिधी । लातूर
कांही दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. वीज पडल्याने निलंगा तालुक्यातील कलांडी येथे आणि औसा तालुक्यातील फत्तेपुर येथे आज म्हशी दगावल्याची घटना घडली आहे. या पावसाने शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करीत आहे.
पावसाळयाच्या प्रारंभीच जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला परंतु नंतर तो गायब झाला. सध्या दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. जोरदार मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. औसा तालूक्यातील फत्तेपूर येथे प्रकाश विनायक धानुरे यांची म्हैस वीज पडल्याने मरण पावल्याची घटना घडली. तर निलंगा तालूक्यातील कलांडी येथेही दत्तात्रय गणपत सुर्यवंशी यांची शेतात बांधलेली म्हैस वीज पडल्याने मरण पावली. लातूर तालुक्यातील मुरुड आणि परिसरात दुपारी सुमारे दोन तास चांगला पाऊस झाला. लातूर परिसरातही आभाळ भरुन आलेले होते. औसा तालुक्यातील कांही भागातही पाऊस झाला. अहमदपूर तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस झाला. हडोळती परिसरात रिमझीम पावसाला प्रारंभ झाला होता. देवणी तालूक्यातील वलांडी परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.



























































