
सामना ऑनलाईन, कसारा/मोखाडा
परतीच्या पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून कसाऱ्यासह मोखाडय़ात अक्षरशः दाणादाण उडवून दिली आहे. गारांसह झालेल्या वादळीवाऱ्याने 50 हून अधिक घरांचे नुकसान झाले असून भरपावसात नागरिकांवर उघडय़ावर राहण्याची वेळ आली आहे. मोखाडय़ातही मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे विजेचे पोल पडून अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
मोखाडय़ातील कावडपाडा येथील समाज मंदिरासह इतर घरांचे छप्पर उडाले आहेत. तसेच विजेच्या तारा आणि झाडे रस्त्यावर उन्मळून पडली आहे. त्यामुळे येथील आदिवासींची मोठी वित्तहानी झाली असून वीजपुरकठाही खंडित झाला आहे. नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून त्यांना तत्काळ भरपाई देण्याची मागणी मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ यांनी केली आहे. या पावसाने खरीप हंगामाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे. कसाऱ्यातील मोखावणे, कातकरीपाडा येथील घरांवरील छप्पर उडाले असून 40 घरातील अन्नधान्य व अन्य वस्तूंचे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य दत्ता वातडे, पांडुरंग भोईर यांच्यासह महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.
पालघरात मात्र टिपूस नसल्याने पिके करपली
एकीकडे परतीचा पाऊस मोखाडा, कसाऱ्यात धुंवाधार बरसत असताना बाजूलाच असलेल्या पालघर तालुक्याला मात्र ऑक्टोबर हिटचे प्रचंड चटके सहन करावे लागत आहे. गेल्या दीड महिन्यापासून टिपूस न झाल्याने उभी पिके करपली असून जमिनींना अक्षरशः भेगा पडल्या आहेत. पालघर जिह्यामध्ये जव्हार, मोखाडा या भागांमध्ये पावसाने काल पूर्ण झोडपून टाकले आहे, तर पालघर जिह्यातील पश्चिमेला पालघर तालुक्यातील गेले दोन महिने पाऊस न पडल्याने भातशेती करपून गेली आहे, पण सध्या मोखाडा, कसाऱ्यात पडत असलेला पाऊस प्रमाणापेक्षा जास्त असल्याने दोन्ही ठिकाणी शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. काही ठिकाणी शेतकरी बोअरवेल व विहिरीतील पाणी पाइपलाइनने घेऊन शेतीला पुरवत आहेत. इतकी भयंकर परिस्थिती पालघर तालुक्यात झाली असून हातातोंडाशी आलेला घास टिकवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत.
कृषी विभागातून आमच्याकडे कोणतीच माहिती आली नाही तरीही मी माहिती घेऊन पाहणी करेन – महेश सागर, तहसीलदार पालघर
शिवसेना मदतीला धावली
कसाऱ्यातील मोखावणे व कातकरीपाडय़ाला अस्मानी संकटाचा तडाखा बसताच शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, माजी आमदार दौलत दरोडा, आमदार पांडुरंग बरोरा यांसह शिवसैनिकांनी धाव घेत आपग्रस्तांना मदतीचा हात दिला. तसेच नुकसान झालेल्या गावकऱ्यांना शासकीय मदत देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
























































