मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ‘हीट अॅण्ड रेन’ अशी स्थिती आहे. दिवसभर कड ऊन, प्रचंड उकाडा आणि रात्री पाऊस पडत आहे. सोमवारी सायंकाळपासून मुंबईत गिरगाव, अंधेरी, विरार तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूरपासून कर्जतपर्यंत. तसेच नवी मुंबई, पालघर, रायगडमध्ये विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. भिवंडीत तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला, अनेक घरांचे पत्रे उडाले. दरम्यान, सोमवारी कुलाबा येथे 35 तर सांताक्रुझ येथे 33 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
वातावरणात 90 टक्क्यांहून अधिक आर्द्रता असल्यामुळे अंगातून अक्षरशः घामाच्या धारा वाहत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून आहे. मुंबईत सायंकाळनंतर कधी हलक्या सरी कोसळत आहेत तर कधी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.
बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने बुधवारपर्यंत मुबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि भिवंडीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहातील असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
n ऊन आणि पाऊस असे वातावरण, त्यात मुंबईत हवेची खालावलेली गुणवत्ता यामुळे आजारांना आमंत्रण मिळाले आहे. सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत.