
मुंबई शहर व उपनगरांत रविवारी पावसाचा जोर आणखीन वाढला. शहरात मागील आठवडाभर अधूनमधून पाऊस पडत असून रविवारी सकाळी जोर‘धारा’ कोसळल्याने हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. जवळपास तासभर पावसाची संततधार सुरू होती. मुंबईकरांनी पावसाच्या साक्षीने रविवारच्या सुट्टीचा आनंद लुटला.
तळकोकणात सिंधुदुर्गात मान्सून दाखल होताच मुंबईत पावसाचा जोर वाढला. रविवारी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने घराबाहेर पडलेले मुंबईकर सुट्टीचा योग साधत पावसामध्ये भिजून माघारी परतले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मुंबईत मान्सून सर्वसाधारण तारखेच्या 10-12 दिवस आधी दाखल होणार असल्याची ‘गुडन्यूज’ दिली आहे. शहरात सर्वसाधारणतः 11 जूनला मान्सूनचे आगमन होते. यंदा 28 मेपूर्वीच मान्सून मुंबईकरांचा आनंद द्विगुणित करेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई शहर परिसरात 37 मिमी पाऊस
मुंबई महापालिकेने रविवारी सकाळी 8 वाजता केलेल्या नोंदीनुसार, शहर परिसरात 37 मिमी, पश्चिम उपनगरात 18 मिमी आणि पूर्व उपनगरात 15 मिमी पाऊस पडला. मागील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे तलावांतील पाणीसाठय़ातही वाढ झाली आहे.
मान्सूनचे मुंबईतील
‘अर्ली इनकमिंग’
वर्ष तारीख
1956 29 मे
1990 31 मे
1962 29 मे
1971 29 मे
2006 31 मे
बाणगंगा तलावाभोवतीची भिंत कोसळली
मुंबईत शनिवार रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा तडाखा शहरातील अनेक भागांना बसला आहे. मलबार हिल येथील प्रसिद्ध बाणगंगा तलावाजवळील संरक्षण भिंत रविवारी सकाळी खचली आणि कोसळली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून खचलेल्या भिंतीच्या आजूबाजूला बॅरिकेट्स उभे करण्यात आले आहेत.