मुंबईसह चार जिल्ह्यांना रेड तर विदर्भाला यलो अलर्ट; हवामान विभागाचा अतिवृष्टीचा अंदाज

2445

मुंबई, उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरीमध्ये मंगळवारी अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवत या चार जिल्ह्यांसाठी सोमवारी रेड अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत रात्रीपासूनच मूसळधार पावसाने बरसायला सुरुवात केली. गेल्या 24 तासात या चार जिल्ह्यात 250 ते 300 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यातील सर्वाधिक पाऊस रात्रीच्या वेळी पडल्याचे हवामान विभागाने सांगितले. आता येत्या 48 तासासाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट तर विदर्भाला यलो अलर्ट दिला आहे.

बंगालच्या उपसगारात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने अरबी समुद्रावरून येणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यांची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे मुंबई, उपनगरे, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम किनारपट्टीच्या भागात येत्या 48 तासात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मुंबईसह या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. दक्षिण कोकणात पासवाचा जोर जास्त राहणार आहे. तसेच या चार जिल्ह्यातील काही ठिकाणी मूसळधार ते अतिमूसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई, कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असतानाच विदर्भातही येत्या 48 तासात जोरदर पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागपूरसह गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. नागपूर जिल्ह्यात आठवडाभर पाऊस राहणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या