पारनेर शहर व परिसरात धुवाँधार पाऊस

66

सामना प्रतिनिधी । पारनेर

पारनेर शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी तब्बल 47 मिलीमिटर पाऊस कोसळला. गेल्या काही वर्षात एकाच दिवसात इतक्या मोठया प्रमाणावर पाऊस पडण्याची ही पहिलीच घटना असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे शहर परिसरातील दोन घरांवरील पत्रे उडून गेल्याने दोन शेतकरी कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत.

पारनेर तालुक्यात अवकाळी पाऊस हमखास पडतो. त्याच जोरावर शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे भवितव्य अवलंबून असते. यंदा मात्र अवकाळी पावसाने हुलकावणी दिल्यानंतर मोसमी पावसानेही पाठ फिरविल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. गेल्या आठवडयात सुमारे अर्धा तास पावसाच्या सरी कोसळयानंतर शेतकऱ्यांना मोठया पावसाची अपेक्षा असतानाच मंगळवारी सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास धुवाँधार पावसाला सुरूवात झाली. हा पाऊस सुमारे चाळीस मिनीटे कोसळत होता. जोरदार पावसामुळे तहसिल परिसरातील पर्जन्यमापकावर 47 मिलीमिटर पावसाची नोंद झाली.

शहराच्या विविध भागात संथ गतीने सुरू असलेल्या पावसाने तराळवाडी परिसरात उशीराने सुरूवात केली तीही वादळी वाऱ्यासह वादळाच्या तडाख्यात. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर धोंडीभाऊ तराळ व भाउसाहेब शेरकर या शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे लोखंडी अँगलसह उडून गेले. सायंकाळची वेळ असल्याने दोन्ही कुटूंबातील सदस्य घरीच होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र मुसळधार पावसात दोन्ही कुटुंबियांचे संसारोपयोगी साहीत्य भिजून गेले. पाऊस सुरू असतानाच आजूबाजूच्या नागरीकांनी दोन्ही कुटुंबांतील सदस्यांना घराबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हालविले. बुधवारी दुपारी माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक अनिकेत औटी, स्थानिक नगरसेवक नंदा देशमाने यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दोन्ही कुटुंबियांची भेट घेऊन शासकिय मदत मिळवून देण्याचे अश्‍वासन दिले. औटी यांनी तेथूनच तहसिलदार प्रविण चव्हाणके यांच्याशी संपर्क करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत पोहविण्याच्या सुचना दिल्या. वादळामुळे विजेचे खांब पडले असून या परिसरातील विज पुरवठाही खंडीत झाला आहे. विजपुरवठा सुरळीत करण्याच्या सुचनाही महावितरणचे उपअभियंता प्रशांत आडभाई यांना औटी यांनी दिल्या.

मंडलनिहाय मंगळवारी झालेला पाऊस व आतापर्यंतचा पाऊस पुढीप्रमाणे : पारनेर 47, 67, सुपा 10, 25, भाळवणी 5, 8, वाडेगव्हाण 2, 39, वडझिरे 5, 17, निघोज 3, 8, पळशी 0, 7, टाकळीढोकेश्‍वर 0, 7.

आपली प्रतिक्रिया द्या