रत्नागिरी, राजापुरात पावसाचा कहर

81

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

अतिवृष्टीमुळे रत्नागिरी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. सोमवारी रात्रभर धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी शहर आणि परिसर जलमय झाला. शहरातील रस्ते पाण्याने तुडूंब भरून वाहत होते. गेल्या 24 तासात रत्नागिरी तालुक्यात 212 मिमी आणि राजापूर तालुक्यात 251 मिमी पाऊस पडला. राजापूर शहरातही पाणी भरून जवाहर चौक जलमय झाला होता.यंदाच्या मौसमात रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यात पहिल्यांदाच अडीचशे मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला.

रत्नागिरी शहरातील बाजारपेठेसह मारूतीमंदिर, अभ्युदयनगर, कुवारबाव, शीळ, मिरजोळे परिसरात पाणी साचले. शहरातील नव्या बांधकामांचा फटका यावेळी बसला. नव्या इमारतींमुळे अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे इमारतीच्या तळमजल्यावर पाणी भरल्याच्या घटना घडल्या. ही रत्नागिरीसाठी धोक्याची सूचना आहे. पाण्याचा निचरा झाला नाही तर रत्नागिरीतही पूरस्थिती दूर नाही याचे अनुभव रत्नागिरीकरांनी काल घेतले. शीळ-मिरजोळे दरम्यानच्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक काही काळ ठप्प होती. केळ्ये गावातही मोरी खचल्याने वाहतूक बंद झाली. मुसळधार पावसामुळे धामणसे ओरी रस्त्यावर रत्नेश्वर मंदिर येथे मोरीवरील रस्ता खचून धामणसे ओरी दरम्यानचा वाहतूक बंद झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या