कोरेगावच्या दक्षिण भागात धुवाँधार;चार वर्षांनंतर कमंडलू नदीला पूर

कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या धुवाँधार पावसामुळे अंभेरी देवदरी येथील सह्याद्री पर्वतरांगेत उगम पावणाऱया कमंडलू नदीला तब्बल चार वर्षांनंतर पूर आला आहे. हा पूर पाहण्यासाठी रहिमतपूर परिसरातील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती.

रहिमतपूरसह अपशिंगे, अंभेरी, साप, वेळू, बेलेवाडी भागांत मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला. पावसामुळे ओढे-नाले भरून वाहत आहेत. कमंडलू नदी व कापूर ओढय़ाला चार वर्षांनंतर पूर आला असून, जुन्या रामाच्या पुलावर, तसेच नागोबा मंदिराच्या पुलावर नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांत अपेक्षित पाऊस न झाल्याने कमंडलू नदी आटली होती. आता सलग तीन दिवस धुवाँधार पाऊस झाल्याने कमंडलू नदीला पूर आला आहे.