नगर शहरात दमदार पावसाने तारांबळ

नगर शहरात आज दुपारपासून दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. जिह्यातही सर्वदूर दमदार पाऊस झाला. या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यानंतर दुबार पेरणीचे संकट नगर जिह्यावर आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल जाणवू लागला. हवामान खात्यानेही दोन दिवस जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता.

आज नगर शहरामध्ये पडलेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले होते. नगर शहरातील महत्त्वाच्या चितळे रोड, कापड बाजार परिसर, लक्ष्मी कारंजा, नाळेगाव यांसह माळीवाडा, टिळक रोड परिसराच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. सुमारे एक तासभर जोरदार पाऊस सुरू होता. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्यामुळे वाहने अडकून पडलेली होती. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी हातामध्ये गाडी घेऊन नागरिक वाट काढताना दिसून येत होते.

राहुरीला झोडपले

गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाची सोमवारी सायंकाळी राहुरीत पुन्हा एकदा दमदार एण्ट्री झाली. विजांच्या कडकडाटासह तासभर आलेल्या मुसळधार पावसाने राहुरीला अक्षरशः झोडपून काढले. खरीप पिकांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पुष्य नक्षत्रापासून राहुरीत पावसाने दडी मारली होती. लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या मागणीवरून मुळा धरणाच्या उजवा व डाव्या कालव्यातून शुक्रवारी शेती पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. पाऊस टिकून राहिल्यास दोन्ही कालव्याचे पाणी आवर्तन बंद होण्याची दाट शक्यता आहे. सोमवारी रक्षाबंधन सण असल्याने शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात राखी स्टॉल लागले होते. सायंकाळी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे स्टॉलधारक तसेच फळे विक्रेत्यांची पळापळ झाली. बाजारपेठेत पावसाचे पाणी वाहून जाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने येण्या-जाण्याच्या रस्त्यावर तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.