मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने दैना, आजही पावसाचा जोर राहणार

मुंबईसह उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईसह ठाणे, पालघर तसेच कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर दिसला. शनिवारीही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा दमदार आगमन केल्याचे चित्र आहे.

आज पहाटेपासून पावसाने चांगलाच जोर धरला. बोरिवली, कांदिवली, मालाड, दहिसर, अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे, विलेपार्ले, सांताक्रुझ, परळ, दादर, वडाळा, लालबाग, वरळी, भायखळा, कुलाबा येथे पावसाचा जोर अधिक होता. तर कोकण किनारपट्टीवरही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. आज सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच दरम्यान कुलाबा येथे 32.2 मिमी तर सांताक्रुझ येथे 77 मिमी पावसाची नोंद झाली. शहराच्या तुलनेत उपनगरांत पावसाने दमदार हजेरी लावली.