मुंबईकरांची सुट्टी पाण्यात!

‘धो-धो’ पावसामुळे मुंबईकरांची हक्काची सुट्टी पाण्यात गेली. किंग्ज सर्कल, अंधेरी, मालाड, कांदिवली-पूर्व आदी भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. सोमवारी आणि मंगळवारी अनेक भागांत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार मुंबईला दोन दिवसांकरिता पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शनिवारी रात्रीपासून मुंबईत परतीच्या पावसाचा जोर वाढला. मध्यरात्री दादर, परळ, अंधेरी, कांदिवली, पवई, विक्रोळी परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. हा पाऊस अखंडितपणे रविवारी सकाळपर्यंत कोसळत राहिल्याने त्याचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. किंग्ज सर्कल आणि अंधेरी परिसरात पाणी साचले होते. पावसामुळे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला. विलेपार्ले, घाटकोपर, विक्रोळी येथे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबई-अहमदाबाद मार्गावर गाड्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे या महामार्गावर दहिसरपासून वांद्रेपर्यंत गाड्यांच्या ठिकठिकाणी रांगा लागल्याचे चित्र होते.

पालिकेच्या केंद्रावरील पावसाची नोंद (मिलिमीटर)

  • कुलाबा ः 103.20
  • दिंडोशी ः 102. 40
  • चिंचोली ः 100.82
  • बोरिवली ः 97.20
  • भायखळा ः 95.24
  • मालवणी ः 95.20
  • मागाठाणे ः 94.20
  • पवई ः 83.80
  • पासपोली ः 80.40
  • एलबीएस ः 80.20
  • टी विभाग ः 78.20