
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे घर कोसळण्याच्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू आणि ४ राष्ट्रीय महामार्गांसह १,३३७ रस्ते बंद झाले आहेत. स्थानिक हवामान विभागाने बुधवारी कांगडा, मंडी, सिरमौर आणि किन्नौर जिल्ह्यांतील काही भागात मुसळधार पावसाचा आॅरेंज अलर्ट जारी केला आहे. उना आणि बिलासपूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
सोलन जिल्ह्यातील समलोह गावात सोमवारी रात्री उशिरा मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या घराच्या ढिगाऱ्याखाली दबून एका महिलेचा मृत्यू झाला. कुल्लूमधील धालपूर येथे पावसामुळे कोसळलेल्या घराच्या ढिगाऱ्यातून एका पुरूष आणि एका महिलेला वाचवण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, महिलेचा नंतर मृत्यू झाला. दरम्यान, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की, राज्य आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आले आहे. केंद्राकडून विशेष मदत पॅकेज मिळावे असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशला सरकारने आपत्तीग्रस्त राज्य घोषित केले आहे आणि ज्यांची घरे पूर्णपणे खराब झाली आहेत त्यांना ७ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल आणि घरातील सामान उद्ध्वस्त झाल्यास अतिरिक्त ७०,००० रुपये दिले जातील. अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठी एक लाख रुपये दिले जातील. राजधानी शिमलामध्ये बुधवारी कोचिंग सेंटर आणि नर्सिंग संस्थांसह सर्व सरकारी आणि खाजगी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
उपायुक्त अनुपम कश्यप यांनी मंगळवारी संध्याकाळी जारी केलेल्या आदेशात सांगितले की, शिमलामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे आणि भारतीय भूगर्भ सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भूस्खलन होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये येण्यापासून सूट देण्यात आली आहे आणि ऑनलाइन वर्ग घेण्यात येतील. मनालसू नाल्यात पाण्याची पातळी वाढल्याने मनलाईतील सुमारे नऊ गावांचा संपर्क तुटला होता.
मुसळधार पावसामुळे रस्ते बंद झाल्यामुळे हिमाचल प्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी पुढे ढकलण्यात आली आहे. येथे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ४ ते ९ सप्टेंबर दरम्यान होणारी पडताळणी मोहीम आता २४ ते २९ सप्टेंबर दरम्यान चालवली जाईल.
राज्यातील मंडीमध्ये २८२, शिमलामध्ये २५५, चंबामध्ये २३९, कुल्लूमध्ये २०५ आणि सिरमौर जिल्ह्यात १४० रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. राज्य आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटर (SEOC) ने सांगितले की राष्ट्रीय महामार्ग (NH) 3 (मंडी-धरमपूर रोड), राष्ट्रीय महामार्ग 305 (ऑट-सैंज), राष्ट्रीय महामार्ग 5 (जुना हिंदुस्तान-तिबेट रोड), राष्ट्रीय महामार्ग 21 (चंदीगड-मनाली रोड), राष्ट्रीय महामार्ग 505 (खाब ते ग्रामफू रोड) आणि राष्ट्रीय महामार्ग 707 (हटकोटी ते पोंटा) अवरोधित करण्यात आले आहेत.
सोलन जिल्ह्यातील सनवारा येथे भूस्खलन झाल्यानंतर शिमला-कालका राष्ट्रीय महामार्ग 5 अवरोधित करण्यात आला. परिणामी प्रवाशांना खूप त्रास होत आहे. या महामार्गाला हिंदुस्तान-तिबेट मार्ग असेही म्हणतात. अंतर्गत भागात परिस्थिती आणखी वाईट आहे, जिथे अनेक दिवसांपासून रस्ते बंद आहेत. सफरचंद उत्पादक त्यांचे उत्पादन बाजारात पाठवू शकत नाहीत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सोमवारी शिमला-कालका रेल्वे मार्गावर भूस्खलन झाल्यानंतर गाड्या रद्द करण्यात आल्या. येथील रेल्वे सेवा ५ सप्टेंबरपर्यंत बंद राहील. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चंबा जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे ५,००० मणिमहेश यात्रेकरूंना घरी परत पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.