जगबुडी नदीवरील नवा पुल अखेर अवजड वाहनांसाठी खुला

443

मुंबई गोवा महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीवरील नवीन पुल अखेर अवजड वाहतुकीसाठी आज खुला करण्यात आला आहे. दरम्यान पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी गणेशोत्सवाच्या पूर्वी या पुलाची पाहणी करून महिन्याभरात पुलावरून अवजड वाहनांचीही वाहतूक सुरू केली जाईल, असा विश्वास  व्यक्त केला होता.

मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरची वाहतूक गेल्या दोन महिन्यांत पावसामुळे वारंवार बंद करण्यात आली होती. जुन्या जगबुडी पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक ठरले होते. त्यामुळे जगबुडीवरच्या नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा यापूर्वी प्रयत्न करण्यात आला मात्र ऐन पावसाळ्यात या पुलाचा जोडरस्ता खचल्याने पुन्हा जुन्या पुलावरूनच सर्व वाहतूक सुरू ठेवण्याची नामुष्की ओढवली. त्यानंतर या जोडरस्त्याची  डागडुजी सुरू झाली होती.  दरम्यान गणेशोत्वाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यात राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे, खेडचे आमदार संजय कदम, आमदार भास्कर जाधव यानी अधिकाऱ्यांना सोबत घेत  पुलाची  पाहणी करून नवीन पुल छोट्या वाहनांच्या  वाहतुकीसाठी खुला केला होता. जगबुडी नदीवरील नवीन पुलाच्या कामाचा शुभारंभ एप्रिल 2015 रोजी  करण्यात आला मात्र तब्बल चार वर्षे उलटूनही या पुलाचे काम पूर्ण करून घेण्यात महामार्ग बांधकाम विभागाला अपयश आले आहे. गेले काही महिने या पुलाचे काम संथगतीने सुरू होते. यावर्षी पावसाळ्यात नवीन पुलावरून वाहतूक सुरू होईल अशी अपेक्षा वाहनचालकांना होती. मात्र नवीन कंत्राटदार नेमण्याच्या प्रक्रियेत वेळ गेल्यामुळे पुलाचे काम करणाऱ्या नवीन ठेकेदार कंपनीला कमी अवधी मिळाला.  नवीन पुलाचे काम पूर्णत्वास न गेल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून जुन्या जगबुडी पुलावरून प्रवास करावा लागत होता तर मुसळधार पावसात महसूल व पोलीस प्रशासनाला डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागला. अखेर पावसाळ्याच्या अखेरीस हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या