ऑक्टोबर की जून…? मुंबईत पावसाचा ‘धांगडधिंगा’ सुरूच

मुंबई शहरासह राज्यभरात परतीच्या पावसाचा ‘धांगडधिंगा’ सुरूच आहे. तीव्र उन्हाचे चटके सहन कराव्या लागणाऱया ऑक्टोबरमध्येही मुंबईकरांना घामाच्या धारांऐवजी पावसाच्या सरींचा मारा अंगावर झेलावा लागला. शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी पावसाने मुंबईत हजेरी कायम ठेवली. किंबहुना, शहर परिसरात मुसळधार बरसात केली आणि हा ‘ऑक्टोबर आहे की जून…?’ या प्रश्नाच्या गर्तेत मुंबईकरांना अडकवले. पाऊस आणखी काही दिवस मुक्कामी राहील, असा वेधशाळेचा अंदाज आहे.

ऐन दिवाळीच्या धामधुमीत पावसाने पुन्हा जोर धरला. दिवाळीपासून अधूनमधून हजेरी लावणाऱया पावसाने मुंबई शहर आणि उपनगरांत सलग चार दिवस रिपरिप सुरू ठेवली आहे. शुक्रवारी दुपारनंतर शहर परिसरात पावसाचा जोर अधिक वाढला. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱया नोकरदारांची प्रचंड तारांबळ उडाली. नैऋत्य मोसमी पावसाने यंदा लवकर एक्झिट घेतली होती. मात्र नंतर दक्षिण हिंदुस्थानातून आलेले ईशान्य मोसमी वारे तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र याचा परिणाम होऊन मुंबई शहर आणि उपनगरांच्या अनेक भागांत पावसाची हजेरी लागली आहे. रात्री अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. पवई, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल, बोरिवली, गोरेगाव परिसरात जोरदार पावसाने मुंबईकरांची धाकधूक वाढवली. परतीच्या पावसाचा मुक्काम पुढील दोन दिवस कायम असेल, अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

लोकलसेवेला विलंब, प्रवाशांची रखडपट्टी

अधूनमधून मुसळधार हजेरी लावलेल्या पावसाने शुक्रवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलसेवेचे वेळापत्रक विस्कळीत केले. दोन्ही मार्गांवरील अनेक लोकल ट्रेन उशिराने धावल्या. त्यामुळे घरी वेळेत पोहोचण्यासाठी घाई करणाऱया प्रवाशांची ठिकठिकाणी लोकल प्रवासात रखडपट्टी झाली. मध्य रेल्वेवर अनेक लोकल ट्रेनना जवळपास 20 ते 35 मिनिटे विलंब झाला. त्याआधी सकाळी तांत्रिक बिघाडाचा त्रास प्रवाशांनी सहन केला होता.

हवेची गुणवत्ता सुधारली

सलग चार दिवस रिपरिप सुरू ठेवलेल्या पावसाने मुंबई शहर आणि उपनगरांतील हवेची गुणवत्ता सुधारली आहे. एरव्ही दिवाळीच्या दिवसांत फटाक्यामुळे प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचते. यंदा पावसामुळे प्रदूषण नियंत्रणात राहिले असून अनेक भागांतील हवेची गुणवत्ता समाधानकारक श्रेणीत नोंदवली गेली आहे. पेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’वरील नोंदीनुसार शुक्रवारी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 66 अंक होता. हा निर्देशांक ‘चांगल्या’ श्रेणीत मोडत असल्याचे हवामानतज्ञांनी स्पष्ट केले.