
कतारच्या प्रादेशिक जलक्षेत्रात रविवारी पहाटेच्या सुमारास एका हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच कतारच्या संरक्षण मंत्रालयाने तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे. कतारच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर अपघात झाल्यापासून त्यांचे विशेष पथक देशाच्या सागरी हद्दीत शोध आणि बचावकार्य करत आहेत. हे अभियान कोस्ट्स आणि बॉर्डर्स सिक्योरिटीचे जनरल डायरेक्टरेटचे समुद्री शोध आणि बचाव पथक आणि अंतर्गत सुरक्षा दलाच्या कतार आंतरराष्ट्रीय शोध आणि बचाव पथकाच्या समन्वयाने सुरू आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
पाकिस्तान ठरला सर्वाधिक दहशतवादी देश
‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026’ मध्ये पाकिस्तानला जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश म्हणून घोषित करण्यात आले आहे. या यादीत पाकिस्तानने बुर्किनो फासो, नायजर, नायजेरिया आणि माली यांसारख्या देशांना मागे टाकले आहे. पाकिस्तानमध्ये सतत वाढत असलेल्या दहशतवादी घटनांमुळे आणि अंतर्गत अस्थिरतेमुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ‘ग्लोबल टेररिझम इंडेक्सनुसार’ 1 जानेवारी ते 22 मार्च 2026 या कालावधीत पाकिस्तानमध्ये 245 पेक्षा जास्त दहशतवादी घटना नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये डय़ुरंड लाईन आणि अफगाणिस्तानसोबतच्या सीमावादाचा समावेश केलेला नाही. याचाच अर्थ पाकिस्तानात अंतर्गत भागात मोठय़ा प्रमाणात दहशतवाद वाढत चालला आहे. काही वेळा दहशतवाद्यांनी पोलीस आणि रेल्वेवरही हल्ले केल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या दहशतवादी घटनांमध्ये पाकिस्तानात आतापर्यंत 270 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 410 पेक्षा जास्त पाकिस्तानी सुरक्षा दलातील जवान वेगवेगळय़ा हल्ल्यांमध्ये ठार झाले आहेत.
मणिपूरमध्ये कुकी समुदायाची सरकारसोबत चर्चा
मणिपूरमध्ये जवळपास तीन वर्षांपासून सुरू असलेल्या वांशिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग यांनी शनिवारी गुवाहाटी येथे कुकी-झो काwन्सिलच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. मे 2023 मध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर मणिपूर सरकारचे प्रमुख आणि कुकी-जावा समुदायाच्या सर्वोच्च नेतृत्वाने समोरासमोर चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुमारे सवादोन तास चर्चा झाली. या बैठकीत कोणताही ठोस करार झाला नाही. मात्र कुकी-जावा शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर अनेक प्रमुख मागण्या ठेवल्या. कुकी समुदायाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, संघर्षात प्राण आणि मालमत्ता गमावलेल्या पीडितांना न्याय मिळणे ही कोणत्याही शांतता प्रक्रियेसाठी एक पूर्वअट आहे.
























































