मंगळ ग्रहावर हेलिकॉप्टर उड्डाणाची मोहीम फत्ते

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) नवा इतिहास रचला आहे. या संस्थेने मंगळ ग्रहावर ‘इंजिन्युटी’ हेलिकॉप्टरचे उड्डाण करण्याची मोहीम अखेर सोमवारी फत्ते केली. सायंकाळी चारच्या सुमारास या इतिहासाची नोंद झाली. नासाच्या संशोधकांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तब्बल सहा वर्षे प्रचंड मेहनत घेतली. या कामगिरीबद्दल नासाच्या संशोधकांवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.

मंगळ ग्रहावरील हेलिकॉप्टर उड्डाणाच्या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी जगभरातील तमाम खगोलप्रेमींना उत्सुकता लागली होती. सोमवारी नासाच्या काही चॅनेल्सच्या माध्यमातून या ऐतिहासिक घटनेचे लाइव्ह प्रसारण करण्यात आले. त्यामुळे खगोलप्रेमींना दुसऱया ग्रहावरील पहिल्या हेलिकॉप्टर उड्डाणाचा सुवर्णक्षण नजरेत टिपता आला.

या हेलिकॉप्टर उड्डाणासाठी सुरुवातीला 11 एप्रिल तारीख ठरवली होती. ती पुढे ढकलून नंतर 14 एप्रिलचा मुहूर्त निवडण्यात आला. मात्र त्यावेळी हेलिकॉप्टर उड्डाण चाचणीदरम्यान टायमरमध्ये बिघाड झाला. अखेर सोमवारी हेलिकॉप्टर उड्डाणाची मोहीम निर्विघ्नपणे पार पडली.

‘इंजिन्युटी’ हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहावरील जेजेरो क्रेटरमध्ये केलेल्या तात्पुरत्या हेलिपॅडवरून उड्डाण घेतले. सुमारे 1.8 किलोच्या रोटरक्राफ्टने चार कार्बन-फायबर पातींच्या आधारे उड्डाण केले. या पाती मिनिटाला 2500 वेळा फिरतात. हा वेग पृथ्वीवर उड्डाण करणाऱया हेलिकॉप्टरच्या पातींच्या रोटेटिंग वेगापेक्षा आठपट अधिक आहे.

नजीकच्या काळात आणखी साहसी उड्डाणे – नासा

मंगळ ग्रहावरील हेलिकॉप्टर उड्डाणाने नासाचा उत्साह द्विगुणित केला आहे. मंगळावरील वातावरण पृथ्वीच्या तुलनेत 100 पट अधिक हलके आहे. अशा प्रतिकूल वातावरणात आम्हाला हे ऐतिहासिक यश मिळाले आहे. या सुरुवातीच्या यशामुळे दूरच्या जगाचा शोध घेण्याचे तंत्र बदलू शकेल. नजीकच्या काळात आणखी साहसी उड्डाणे पाहायला मिळतील, असा दावा नासाने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या