यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर हेलिकॉप्टरने होणार पुष्पवृष्टी

यंदाच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला हेलिकॉप्टरमधून लाल किल्ल्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशपरदेशातून आलेले विशेष अतिथी, सुरक्षा दलातील जवान, कोरोना योद्धे आणि उपस्थितांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यंदा स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाप्रमाणेच लाल किल्ल्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

या पुष्पवृष्टीसाठी लाल किल्ल्याला हवाई दलातील अधिकाऱ्यांसह इतर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यांनी पुष्पवृष्टीच्या नियोजित कार्यक्रमासाठी पाहणी केली. या पुष्पवृष्टीमुळे पंतप्रधान, आलेले अतिथी आणि नागरिकांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही पाहणी करण्यात आली. यावेळी ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेत त्यादृष्टीनेही पाहणी करण्यात आली.

यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यात आपल्या स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक प्रवासही उलगडण्यात येणार आहे. त्यासाठी मीणा बाजारमध्ये विशेष चित्रांची गॅलरी बनवण्यात येणार आहे. त्यात सरकारच्या विकास कार्यांचाही समावेश असणार आहे. संरक्षण मंत्रालयाद्वारे याचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान आणि उपस्थित मान्यवर या गॅलरीला भेट देणार आहेत. स्वातंत्र्यदिनानंतर ही गॅलरी सर्वसामान्यांसाठी खुली करणार किंवा नाही, याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.

पंतप्रधान देशाला संबोधित करतात, त्याठिकाणी फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. तसेच दरवर्षी शालेय विद्यार्थी बसतात, त्याठिकाणी यंदा कारोना योद्धे किंवा एनसीसी कॅडेट्सना बसवण्यात येणार आहे. यंदा कमी संख्येने अतिथींना आमंत्रित करण्यात येणार आहे. यावर्षी ही संख्या 120 पर्यंत असेल. दरवर्षी ही संख्या 800 पर्यंत असते. सुरक्षेच्या दृष्टीनेही कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेत, त्यादृष्टीनेही सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या