छोटासा हात मदतीचा!

कोरोनाच्या या सात महिन्यांनी सगळय़ांनाच माणुसकी शिकवली आणि प्रत्येकजण आपल्या परीने Good Samiritan झाला. ही चिमूटभर मदत लाखमोलाची ठरली. मदतीचे हे नवे रूप दाखविणारे नवे सदर…

>> मुग्धा गोडबोले (अभिनेत्री)

लॉकडाऊनच्या काळात किती भयानक पद्धतीने लोक जगत होते हे मला भेटणाऱया वेगवेगळ्या माणसांमधून दिसत होते. त्यामुळे या काळात शक्य तेवढी अनेकांना मी खारीचा वाटा उचलून मदत करत होते, पण हात तोकडे पडत होते. या काळात मला अनेक माणसं कळली. काही डोळ्यांसमोर दिसत होती, तर काही मित्रमैत्रिणींच्या माध्यमातून कळत होती.

मुंबईमधल्या किंवा काही संस्थांमधून मी मदत करत होते. लॉकडाऊनच्या आणि त्यानंतरच्या काळात ज्या ज्या लोकांनी त्या काळात आपापले व्यवसाय सोडून वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, माझ्या माहितीतल्या कोणी नवीन उद्योग सुरू केले, त्या सगळ्यांकडून एक-एक वस्तू विकत घेतल्या. वांदय़ात एक मुलगी रस्त्यावरच्या कुत्र्यांना फीड करते. तिची एक छोटीशी संस्था आहे. तिच्याबाबत एका मैत्रिणीकडून कळले. लॉकडाऊन काळात या कुत्र्यांना लागणारे जेवणही मिळताना अडचणी येत होत्या. तेव्हा माझ्याकडून मी पाठवले होते.

माझा एक मित्र पालघरच्या कष्टकरी समाजासाठी बऱयापैकी काम करतो. ते साडेसहाशे रुपये वर्गणी काढून एका कुटुंबाला अन्न पुरवठा करत होते. त्याच्यासाठी मी मदत केली. जेवढं शक्य होतं तेवढी मी या ना त्या माध्यमातून मदत करत होते. नाटय़ निर्माता संघाने जे काही मदतीचं आवाहन केलं होतं, ते मी माझ्या बाजूने केलं. माझ्या बाजूने मी प्रत्येकासाठी केलं. मी ठरवलं होतं, एका-एकाला मदत करायची. कारण त्यापेक्षा जास्त प्रत्येकाला शक्य असते असे नाही.

आपल्या एवढय़ाशा मदतीने फार काही कोणाला मोठा फायदा होईल असे नाही, पण समोरच्याला एक हुरूप मिळतो, एक उभारी येते. आपल्या या आवाहनाला लोक प्रतिसाद देतात, आपल्याला मदत करायला लोक पुढे येतात एवढं जरी कळलं तरी तेवढय़ापुरती त्या माणसाला उभारी येते आणि या काळात त्याचीच जास्त गरज होती. आर्थिक गोष्टी एक वेळ मॅनेज होऊ शकतात, पण माणूस मनाने खचला की, त्याला उभं राहणं कठीण जातं. त्यामुळे तेवढं मी माझ्या बाजूने केलं.

मी लिखाणासाठी एकदोन मुलांना एका कॉन्सेप्टवर काम करायला सांगितले, त्याच्यावर काही झालं तर त्याचे त्यांना मी पैसे देईन. अशा पद्धतीने काहीतरी आपल्याकडे काम आहे या कल्पनेनेही लोकांना बरे वाटत असतं. जेवढं शक्य होतं तेवढं केलं. फार काही मोठं केलं नाही. आपली लहानशी मदतही समोरच्याच्या चेहऱयावर आनंद आणते आणि तोच आनंद आपल्याला समाधान देऊन जातो.

खरं सांगायचे तर एकापुढे एक वाईट बातम्या या काळात येत होत्या. एकूण सर्व निराशाजनक वातावरण होतं. आमच्याकडे कचरा गोळा करणारा मुलगा नेहमीप्रमाणे कचरा गोळा करायला दारात आला आणि दाराची बेल वाजवली. मी कचरा दिला, पण त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्याला विचारल्यावर तो बोलला, माझ्या घरी दोन लहान मुलं आहेत, पण आजूबाजूला कोरोनाचे रुग्ण सापडत असल्यामुळे परिसर सील केला आहे. कुठेही बाहेर पडता येत नाही. मुलांसाठी आजूबाजूला बिस्किटही मिळत नाही आहेत. मला पैसे देऊ नका. तुम्हाला जमलं तर माझ्या मुलांसाठी काहीतरी द्या. ते ऐकून बाहेर किती भयाण परिस्थिती आहे याची कल्पना आली. लोकांचे किती हाल होत होते याची जाणीव त्याच्याकडून झाली. तेव्हा माझ्यासाठी जेव्हा शक्य होत होतं तेव्हा बिस्किट, केक म्हणा, लहान मुलांना आवडणारी चिप्सची पाकिटं म्हणा, मी देत होते. जवळ जवळ दरवेळी जेव्हा आम्ही बाहेरून वस्तू मागवत होतो त्या काळात त्याला लक्षात ठेवून त्याच्या मुलांसाठीही खाऊ घेऊन दुसऱया दिवशी त्या मुलाला देत होते.

असाच दुसरा प्रसंग म्हणजे माझ्या ओळखीतला एक मुलगा टेलिव्हिजन, नाटकात लहान-मोठी कामं करत होता. अचानकपणे सगळं बंद झाल्यावर त्याने सुकी मासळी विकायला सुरुवात केली. आता अगदी खरं सांगायचं तर माझ्या घरी सुकी मासळी कोणी खात नाहीत, पण मी विचार केला की, मी त्याच्याकडून ती घेऊन माझ्या पाच-सहा मैत्रिणींना वाटेन. यामागची भावना हीच होती की, माझ्या पाचसहाशे रुपयांनी त्याला उभारी येते, त्याला लोक मदत करतायत, त्याला मदत करायला पुढे येतायत, त्याला तो व्यवसाय करण्याची मनात उमेद राहील नाहीतर हातात जे काम आहे तेही बरे चालू नाहीय आणि नवीन काहीतरी करायला गेलो, तेही बरे होत नाहीय असं म्हटल्यावर माणूस अजून खचून जातो. म्हणून मी त्याच्याकडून ती सुक्या मासळीची पाकिटं घेतली आणि मी माझ्या काही सुकी मासळी खाणाऱया मित्रमैत्रिणींना देऊन टाकली. काय हरकत आहे. आपल्याला जर शक्य आहे तर अशा प्रकारची मदत करायला हरकत नाही.

या सगळ्यात पुन्हा एकदा आपण, आपलं घर, आपली माणसं सगळी बरी आहेत ना, सुस्थितीत आहेत ना हे बघत असतो. काय भयानक पद्धतीने लोक त्या काळात जगत होते हे या अशा काही लोकांमुळे दिसत होतं, जाणवत होतं आणि ते त्रासदायक होत होतं. आपलं सहजीवन दोघांपुरतंच नसते तर एवढय़ा माणसांबरोबर आपण जोडले गेलेले असतो. आपले वॉचमन, आपल्या घरी काम करणाऱया मावशी, ड्रायव्हर सगळे आपल्या आयुष्यात महत्त्वाचा रोल करत असतात. त्यांचीही काळजी घेणं तेवढच महत्त्वाचं आहे हे जाणवलं..

कोरोना सेंटर्स
टिटवाळा गणपती मंदिर सभागृह
शरणनाम हॉटेल, रामकृष्ण नगर, टिटवाळा
वारकरी भवन, सेक्टर 3, बेलापूर
हेगडे भवन, सेक्टर 15, ऐरोली, नवी मुंबई
साफिया शाळा, भिवंडी

आपली प्रतिक्रिया द्या