चिनी सायबर हल्ले – जशास तसे उत्तर हवे!

ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

जसा सर्जिकल स्ट्राइक आपण कश्मीरमध्ये केला होता अशाच प्रकारचा सर्जिकल स्ट्राइक सायबर लढाईमध्ये चीनवर वेळोवेळी करण्याची गरज आहे. त्यांना हे दाखवून देणे महत्त्वाचे आहे की जर तुम्ही आमच्या क्रिटिकल इन्फॉर्मेशन ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चरला धोका निर्माण केला तर त्यापेक्षासुद्धा मोठा धोका आम्ही तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरला निर्माण करून तुमचेसुद्धा नुकसान करू शकतो. म्हणून असा हल्ला करायची हिंमत करू नका. म्हणूनच आक्रमक सर्जिकल सायबर स्ट्राइक चीनला जशास तसे उत्तर देण्याकरिता वेळोवेळी वापरले गेले पाहिजे.

लडाखमध्ये तणाव सुरू असताना चिनी हॅकर्सकडून हिंदुस्थानवर सायबर हल्ले वाढवण्यात आले. हिंदुस्थानसाठी महत्त्वाचे असणारी 10 क्षेत्रे, संस्था, कंपन्यांची निवड हॅकर्सने केली. यामध्ये चार ते पाच विभाग हे लोड डिस्पॅच सेंटरशी निगडित आहेत. त्याशिवाय हिंदुस्थानचे दोन बंदरही चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर होते. संपूर्ण हिंदुस्थानातील वीज पुरवठा खंडित करण्याचा डाव चिनी हॅकर्सचा होता. चिनी हॅकर्सने तब्बल 40 हजार 500 वेळा सायबर हल्ले केले होते. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चिनी हॅकर्सने चिनी मालवेअरने हिंदुस्थानात वीज पुरवठा नियंत्रित करणाऱ्या प्रणालीत घुसखोरी केली. चीनशी निगडित असलेल्या रेडइकोने हिंदुस्थानातील विद्युत यंत्रणेत मालवेअर प्लांट केले. त्याशिवाय हिंदुस्थानचे अतिशय संवेदनशील राष्ट्रीय पायाभूत सुविधांही चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. सिस्टम हॅक करण्यासाठी चिनी हॅकर्स अतिशय अत्याधुनिक व्हायरसचा वापर करत आहे.

गलवान खोऱ्यामध्ये रक्तबंबाळ झाल्यानंतर चीन हिंदुस्थानवर चालवलेले हायब्रीड वॉर अजून तीव्र करेल यामध्ये काहीच आश्चर्यजनक नाही. चीन सायबर हल्ले करू शकतो हेसुद्धा सगळ्यांनाच माहिती आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 12 ऑक्टोबर 2020 ला झालेल्या सायबर हल्ल्याचे वृत्त 1 फेब्रुवारी 2021 ला कसे प्रकाशित होते? ‘न्यूयॉर्क टाइम्स’ सारखी मोठी वर्तमानपत्रे ज्या वेळेला असा लेख लिहितात त्या वेळेला हिंदुस्थानातली मीडिया त्यांच्याकडे जास्त लक्ष देते. खरे म्हटले तर हा सायबर वॉरपेक्षा मानसिक युद्ध म्हणजे प्रपोगंडा वॉरचा प्रकार आहे. ही बातमी हिंदुस्थानवर प्रपोगंडा वॉर करण्यासाठी चीननेच ‘न्यूयॉर्क टाइम्स’ मध्ये प्रकाशित केली का? या लेखात असे सांगण्यात आले आहे की, हिंदुस्थानात मुंबईवर झालेल्या सायबर हल्ल्याचा शोध एका अमेरिकन कंपनीने लावला. हे सत्य आहे का? अशा हल्ल्यांचा शोध लावायला आपल्याला अमेरिकेच्या संस्थेची मदत जरूरी आहे का? तर त्याचे उत्तर आहे अजिबात नाही.

चीनची सायबर हॅकिंगची क्षमता लक्षणीय असली तरी अनेक देश खास तर अमेरिका, जपान, इस्रायल चीनला सायबर युद्धात जशास तसे असे उत्तर देत असतात. 2015 मध्ये वीस लाख चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या मेंबरचा डेटा म्हणजे माहिती हॅक करण्यात आली. सायबर युद्धाकरिता चीनने 3 पीएलए उभी केली आहे जी सायबर चोरीचे काम करते. 4 पीएलएचे काम सायबर हल्ल्यापासून महत्त्वाच्या चिनी संस्थांचे रक्षण करणे हे असते. 3 आणि 4 या दोन्ही संस्था ‘स्ट्रटेजिक सपोर्ट फोर्स’च्या हाताखाली काम करतात. चीन सायबर जगतात आपल्या हस्तकांद्वारे सायबर गुन्हे करतो, हॅकिंग करतो, सायबर चोऱ्या करतो, सायबर दहशतवाद आणि 365 दिवस सायबर युद्ध अशी कृत्य करतो, परंतु हे करताना ते अशा हस्तकांच्या वापर करतात ज्यामुळे हे काम हे कृत्य आम्ही केलेलेच नाही असे ते नेहमीच म्हणत राहतात. म्हणून त्यांनासुद्धा आपण त्यांच्या पद्धतीने जशास तसे उत्तर द्यायला पाहिजे.

‘हिंदुस्थानची नॅशनल टेक्नॉलॉजी रिसर्च ऑर्गनायझेशन’ (NTRO) ही तंत्रज्ञानाच्या मदतीने गुप्त हेर माहिती काढणारी महत्त्वाची संस्था आहे. तिच्या अंतर्गत हिंदुस्थानच्या दोन संस्था ‘नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर’ (National Critical Information Infrastructure Protection Centre) आणि म्हणजे ‘सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’, (CERT) सायबर किंवा हॅकिंग हल्ल्यावर लक्ष ठेवून असतात. ‘नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर’ ही संस्था देशातील राष्ट्रीयदृष्टय़ा महत्त्वाच्या संस्थांच्या सायबर नेटवर्कचे रक्षण करते. वेळोवेळी या संस्थांचे सुरक्षा ऑडिट करते आणि संस्थांमध्ये असलेल्या कमजोरी या त्यांना सांगितल्या जातात. याशिवाय योग्य वेळी जसा दहशतवादी हल्ल्याचा इशारा मिळतो असाच सायबर हल्ल्यांच्या इशारा दिला जातो आणि सुरक्षेची लेव्हल अजून जास्त वाढवली जाते. या संस्थेला हिंदुस्थानच्या क्रिटिकल इन्फॉर्मेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर चे रक्षण करण्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळाले आहे.

मात्र ज्या वेळेला चीन किंवा पाकिस्तान सायबर हल्ला करण्यामध्ये यश मिळवतात त्यावेळेला दुसरी संस्था म्हणजे कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ही लगेच कारवाई करते आणि जशी सैन्याची ‘क्विक रिऍक्शन टीम’ दहशतवादी हल्ल्याला लगेच प्रत्युत्तर देते तसेच काम ही टीम करते. यांचा रिस्पॉन्स किंवा प्रतिक्रिया ही अतिशय तेज किंवा फास्ट असते. कारण शत्रूचा हल्ला काही सेकंदांमध्ये केला जातो म्हणूनच यांना सदैव तयार राहावे लागते.

आपल्या पंतप्रधान कार्यालयापासून संरक्षण, परराष्ट्र मंत्रालय, हिंदुस्थानी दूतावास, क्षेपणास्त्र्ा प्रणाली, एनआयसी, एवढेच नव्हे तर सीबीआयसारख्या गुप्तचर संस्थांपर्यंत सर्व ठिकाणी असलेल्या संगणकांवर सायबर हल्ले करण्यात आले असून नजर ठेवण्याचे प्रकार घडले आहेत. व्हर्च्युअल दहशतवाद, घुसखोरी तसेच लष्करीदृष्टय़ा गोपनीय माहिती लीक होण्याच्या घटना यावरून असे दिसून येते की, इंटरनेटच्या मायाजालात लपलेल्यांना आवर घालण्यात अपयश आले तर त्याची मोठी किंमत मोजावी लागते.

सर्जिकल सायबर स्ट्राइक

देशाची सर्व प्रकारची माहिती आज संगणकांमध्येच एकत्रित केलेली असते. सायबर क्षेत्रांमध्ये रोज काहीतरी नवीन नवीन संशोधन केले जाते म्हणूनच आपल्याला जसे ‘ऍण्टी व्हायरस’वर रोजच संशोधन करून आपल्या कॉम्प्युटरची सुरक्षा करावी लागते तशीच कामगिरी या संस्था करत असतात. चीन हिंदुस्थानवर हल्ले करण्याकरिता रोजच नवीन नवीन प्रकारांचा वापर करतो आणि आपण आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु कुठल्याही रक्षा पद्धतीला स्वतःचे सदैव रक्षण करणे हे फार मोठे आव्हान असते. आपण अमेरिका, जपान, कोरिया आणि तैवान यांची पण मदत घ्यायला पाहिजे. खास तर तैवानची क्षमता ही चीनपेक्षा जास्त चांगली आहे.

जसा सर्जिकल स्ट्राइक आपण कश्मीरमध्ये केला होता अशाच प्रकारचा सर्जिकल स्ट्राइक सायबर लढाईमध्ये चीनवर वेळोवेळी करण्याची गरज आहे. त्यांना हे दाखवून देणे महत्त्वाचे आहे की जर तुम्ही आमच्यावर हल्ला करून आमच्या क्रिटिकल इन्फॉर्मेशन ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चरला धोका निर्माण केला तर त्यापेक्षासुद्धा मोठा धोका आम्ही तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरला निर्माण करून तुमचेसुद्धा नुकसान करू शकतो. म्हणून असा हल्ला करायची हिंमत करू नका. कारण जसे आम्हाला आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे रक्षण सदैव करणे हे अशक्य असते तसेच आव्हान तुम्हाला पण आहे. म्हणूनच आक्रमक सर्जिकल सायबर स्ट्राइक चीनला जशास तसे उत्तर देण्याकरिता वेळोवेळी वापरले गेले पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या