निसर्गचेतनेचे संग्रहालय

186

>> प्रफुल्ल भांबूरकर

गोदावरी पश्चिम घाटातून अवतरून बंगालच्या उपसागरात विलीन होते या नद्यांमधील भूप्रदेश हा वैशिष्टय़पूर्ण असून निसर्गाचं वरदानच आहे. कालिदासांच्या ‘मेघदूत’ महाकाव्यात याचे विलोभनीय वर्णन आहे. पुरातन काळात नर्मदा ते गोदावरीमधील प्रदेशाला ‘झाडीमंडला’ म्हणजेच घनदाट जंगलाचा प्रदेश संबोधले जायचे. ब्रिटिश कप्तान ब्लंटने 1795 साली बनारस ते राजमुंद्री प्रवासात या दुर्गम भागाची ओळख आधुनिक जगाला करून दिली. गडचिरोलीतील आलापल्ली जंगलातील वन वैभव हे पुरातन समृद्ध जंगलाचा अनुभव व अंदाज देणारे आहे.

मानवी संस्कृती आणि विकासाला नद्यांनी प्रवाहित केले आहे. नदीची उत्पत्ती पर्वतावर तर तिचे पोषण वनांमुळे होत असल्याने वेदकालापासून नदीचे महत्त्व जननी म्हणून विषद केलेले आहे. म्हणूनच पर्वत, वने ही पूजनीय ठरतात. जीवसृष्टी संपूर्णतः या घटकांवर अवलंबून असल्याने यांना देवत्व प्राप्त आहे. हिंदुस्थानात नदी मातृतुल्य आहे. संपूर्ण हिंदुस्थानात नर्मदा आणि गोदावरी गंगे इतकीच पूजनीय आहे. सातपुडा – मैकल, विंध्या आणि पश्चिम घाट अशा पर्वतराजींच्या सान्निध्यातील या प्रदेशात म्हणूनच समृध्द जैवविविधता संग्रहित आहे. मैकल पर्वतातून नर्मदा उगम पावून पश्चिम वाहिनी होऊन अरबी समुद्राला मिळते.

गोदावरी प. घाटातून अवतरून बंगालच्या उपसागरात विलीन होते या नद्यांमधील भूप्रदेश हा वैशिष्टय़पूर्ण असून निसर्गाचं वरदानच आहे. कालिदासांच्या ‘मेघदूत’ महाकाव्यात याचे विलोभनीय वर्णन आहे. पुरातन काळात नर्मदा ते गोदावरी मधील प्रदेशाला ‘झाडीमंडला’ म्हणजेच घनदाट जंगलाचा प्रदेश संबोधले जायचे. कापसाच्या अनेक प्रजातींचे जनक असलेले वत्सगुलम ऋषी हे विंध्य ते गोदावरीच्या दंडकारण्य प्रदेशातीलच. ब्रिटिश कप्तान ब्लंटने 1795 साली बनारस ते राजमुंद्री प्रवासात या दुर्गम भागाची ओळख आधुनिक जगाला करून दिली. साल, सागवान, ऐन, बिजा, हलदू, सेमल, मोह, आंबा, जांभूळ ,चार, तेंदू, धावडा, पिंपळ व वड यासारखे प्रचंड वृक्ष, त्यावर निसर्गाने गुंफलेल्या गारंबी, माहूल, पळसवेलच्या असंख्य वेली, तर मधल्या फळीत बेल, आवळा, कवठ, सालई, मोवई, सूर्या, गराडी , अमलताशसारखी असंख्य झाडे, बांबूच्या दाट बेटांसोबत गवताच्या अनेक प्रजाती, बोर, एरोण्या, पळसांनी फुललेली कुरणे यामुळे वन्य जीवसृष्टी परिपूर्ण अशी आहे. गडचिरोलीतील आलापल्ली जंगलातील वन वैभव म्हणून राखून ठेवण्यात आलेल्या वनामुळे पुरातन समृद्ध जंगलाचा अंदाज देणारे आहे.

हिरडा, बेहडा , कुसूम,अर्जुन, तिवस ही इतर महत्त्वाची झाडे. येथील राहणाऱया माडिया, कोरकू, गोंड , बैगा, हलबी, भिल्ल, कोंकणी या महत्त्वाच्या आदिवासी जमाती. नर्मदा खोऱयात सिंहाची तर हत्ती निम्न पेंच खोऱयात आढळण्याची नोंदही आहे. हिंदुस्थानातील मध्य भूभागावर याचे स्थान असल्यामुळे उत्तर दक्षिण आणि पूर्व – पश्चिम या दोन्ही प्रांतातील प्राणी,वनस्पती जगताचा मेळ येथे आढळतो. शतकानंतर रान पिंगळा पेंच, मेळघाट ते नंदुरबारपर्यंत परत दिसायला लागला. वैनगंगा – पैनगंगा या उपखोऱ्यात सारस, माळढोक, तणमोर तसेच लाल व करडा कोंबडा आणि बारमाही नद्यांमुळे माशांच्या अनेक प्रजाती पण अस्तित्वात आहेत. दाट वने , सुपीक माती तसेच पाण्याची मोठय़ा प्रमाणावर उपलब्धता यामुळे कापूस, ज्वारी, तांदूळ, गहू, मका यासारखी पिके तसेच दुर्गम भागात कोदो, कुटकी अशी पिकेही मोठय़ा प्रमाणावर होतात. याशिवाय वनौषधींचा तसेच धान्य व फळांच्या मूळ प्रजाती जोपासून ठेवण्याचे कार्य पण या वनांनी जोपासले आहे.

पर्वतीय, उंचसखल व सपाट भागातील वातावरणानुसार वनांची वैशिष्टय़पूर्ण रचना या भागात दिसते. रुबाबदार सालवृक्षाची वने नर्मदेच्या खोयात तर सागमिश्रित आणि मिश्र झाडांची वने गोदावरी आणि नर्मदेच्या पश्चिम खोऱयांमध्ये पसरली आहेत. वाघ हे या संपूर्ण वनांचे प्रतिनिधित्व करतात. नर्मदेच्या सालबहुल वनातील दलदलसदृश कुरणांमधील बारासिंगा किंवा सालसांबर हे हरीण हिंदुस्थानात याच प्रदेशाचं देणं आहे. गोदावरी – प्राणहिता – इंद्रावती खोऱयातील रानम्हैस ही वैशिष्टय़पूर्ण. प्राणहिता – कोलामारका अभयारण्यात महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू मोठय़ा संख्येने आढळतो. हत्तींचे आगमन 1980 साली झाले, परंतु ते आता मोठय़ा प्रमाणावर या वनांमध्ये स्थिरावत आहे. नुकतेच गडचिरोली – गोंदिया वनक्षेत्रालाही भेट देऊन गेले. महाराष्ट्रात आढळणाऱया वाघांची संख्या जवळपास 96 टक्के विदर्भातील या वनांमध्ये आहे. म्हणूनच वाघांचे भवितव्य या वनांच्या सुरक्षेवर अवलंबून आहे. सध्या वाघ आणि भविष्यात हत्तींच्या संग्रहासाठी हा वन प्रदेश जतन होणे गरजेचे आहे. या समृद्ध वन प्रदेशाला अतिक्रमण, साग वने निर्मिती, खाणी, रस्ते, विकास योजनांमुळे वन्य जीव व वने धोक्यात येऊ घातली आहेत. महाराष्ट्राचं भविष्य या संग्रहित जैवविविधतेच्या संवर्धनावर अवलंबून आहे. निसर्गाचे वरदान असलेले जैवविविधतेच्या जिवंत संग्रहालयाचे संवर्धन पर्यावरण व निसर्गात नवचैतन्य येण्याच्या दृष्टीने नितांत गरजेचे आहे.

(लेखक वन्य जीव व पर्यावरण तज्ञ असून महाराष्ट्र प्रदेश प्रमुख वाईल्ड लाईफ ट्रस्ट इंडियाचे महाराष्ट्र प्रमुख आहेत)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या