गोमांस विक्री करणाऱ्यांना हायकोर्टाचा दणका, दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

448

कायद्यानुसार गायीची हत्या करण्यास बंदी असली तरी बारामतीत चोरीछुप्या पद्धतीने जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरटय़ा पद्धतीने गोमांस विक्री करणाऱया दोघांना मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. पोलिसांनी सादर केलेले पुरावे ग्राहय़ धरत न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. एस.एस. कुरेशी आणि समद कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गायींची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळताच बारामतीत शहर पोलिसांनी आरोपींच्या घराजवळ धाड टाकली. त्या ठिकाणी दोन गायी व चार म्हशी पोलिसांना आढळून आल्या. याशिवाय गायीची कातडी व गोमांस पोलिसांना सापडले. याची दखल घेत पोलिसांनी एस.एस. कुरेशी आणि समद कुरेशी यांना ताब्यात घेतले. आपल्याला अटक करू नये म्हणून आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. पोलिसांनी हस्तगत केलेले गोमांस व इतर पुरावे ग्राहय़ धरत सरकारी पक्षाने या आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जाला जोरदार विरोध केला व आरोपींचा अर्ज मंजूर करू नये, अशी मागणी केली. हायकोर्टाने याची दखल घेत आरोपींना दिलासा देण्यास नकार दिला व त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

 

आपली प्रतिक्रिया द्या