वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील परिसरात स्कायवॉकचे बांधकाम शुक्रवारपासून सुरू केल्याची माहिती महापालिकेने सोमवारी उच्च न्यायालयाला दिली. त्यावर हे बांधकाम करताना वांद्रे पूर्व परिसरात होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पावले उचला, असे निर्देश न्यायालयाने वाहतूक पोलिसांना दिले. तसेच महापालिकेला स्कायवॉकचे बांधकाम पुढील दहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले.
वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्व परिसरात स्कायवॉक नसल्यामुळे लाखो नागरिकांची गैरसोय होते, याकडे लक्ष वेधत उच्च न्यायालयाचे माजी कर्मचारी के. पी. पी. नायर यांनी याचिका केली होती. या याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्कायवॉकचे बांधकाम सुरू केल्याची माहिती पालिकेतर्फे अॅड. पूजा धोंड यांनी सोमवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रपुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाला दिली. याची नोंद घेत खंडपीठाने याचिका निकाली काढली. यावेळी नायर यांनी स्कायवॉकचे बांधकाम सुरू झाल्यानंतर वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाल्याचे निदर्शनास आणले आणि वाहतूक नियोजनाबाबत प्रशासनाला निर्देश देण्याची विनंती केली. त्यांची विनंती स्वीकारत खंडपीठाने वाहतूक पोलिसांना वांद्रे पूर्व येथे वाहतूककोंडी होणार नाही, याची खबरदारी घेत योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश दिले.
डेडलाइन पाळण्याची पालिकेला ताकीद
नायर यांनी सुरुवातीला रिट याचिका दाखल केली होती. त्यावेळी पालिकेने वर्षभरात स्कायवॉक बांधकाम पूर्ण करण्याची हमी दिली होती. मात्र त्यानंतरच्या वर्षभरात स्कायवॉकची साधी पायाभरणीही केली नव्हती. त्यामुळे नायर यांनी अवमान याचिका केली होती. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने पालिकेला मार्चमध्ये 15 महिन्यांत स्कायवॉक बांधकाम पूर्ण करण्याबाबत दिलेल्या हमीचे काटेकोर पालन करण्याची ताकीद दिली.