हायकोर्टाचा एमएमआरडीएला दिलासा, 357 कांदळवनाच्या बदल्यात 4444 झाडे लावण्याचे आदेश

209

मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला आज दिलासा दिला. सार्वजनिक हित लक्षात घेता भक्ती पार्क मेट्रो स्थानकाकरिता वडाळा येथील 357 कांदळवन तोडण्यास हायकोर्टाने परवानगी दिली. या बदल्यात 4 हजार 444 कांदळवन गोराई येथे लावण्याचे आदेश हायकोर्टाने एमएमआरडीएला दिले.

एमएमआरडीए मार्फत वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 बांधण्यात येणार आहे. मेट्रोच्या भक्ती पार्क स्थानकासाठी वडाळा येथे 48 पिलर्स उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी कांदळवनांचा अडसर येत असून सीआरझेड 2 मध्ये ही झाडे येत आहेत. ही कांदळवन तोडण्याची परवानगी देण्यात यावी  अशी मागणी करत एमएमआरडीएने हायकोर्टात अर्ज केला होता. या याचिकेवर आज न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी एमएमआरडीएच्या वतीने बाजू मांडताना कोर्टाला सांगण्यात आले की मेट्रोमूळे सार्वजनिक वाहतुकीला पर्याय निर्माण होणार आहे तसेच रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरील ताणही कमी होणार आहे याशिवाय या कांदळवनाच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात गोराई येथे झाडे लावण्यात येणार आहेत. हायकोर्टाने हा दावा मान्य करत कांदळवन तोडण्यास एमएमआरडीएला परवानगी दिली.

वाढत्या लोकसंख्येचा वाहतुकीवर परिणाम

एमएमआरडीएच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी क ऍड. अक्षय शिंदे यांनी बाजू मांडली त्यांनी कोर्टाला सांगितले की लोकसंख्या वाढत असल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. मेट्रो प्रकल्पामुळे निश्चितच वाहतूकीवरील ताण कमी होईल याशिवाय ध्वनी व वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होऊन प्रवाशांच्या वेळेतही बचत होईल.

आपली प्रतिक्रिया द्या