एका ठिकाणी विधान, सात ठिकाणी गुन्हे; जितेंद्र आव्हाडांच्या याचिकेवर हायकोर्टाची मिंधे सरकारला नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या मेळाव्यात बोलताना प्रभू रामचंद्रांबद्दल विधान केले होते. त्या विधानावरून राज्यात सात ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले. त्यावर आक्षेप घेत आव्हाड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने सोमवारी मिंधे सरकारला नोटीस बजावली आणि विविध ठिकाणी गुन्हे नोंदवण्यामागील भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सरकारला दिले.

आव्हाड यांनी अॅड. विनोद उत्तेकर यांच्यामार्फत फौजदारी रिट याचिका केली आहे. त्यावर सोमवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे प्राथमिक सुनावणी झाली. आव्हाड यांच्यातर्फे अॅड. सागर जोशी व अॅड. विनोद उत्तेकर यांनी बाजू मांडली. त्यावर खंडपीठाने मिंधे सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. या वेळी सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी पोलीस महासंचालकांकडून सूचना घेण्यासाठी वेळ मागितला. त्यानुसार सरकारला वेळ देत खंडपीठाने सुनावणी दोन आठवडय़ांसाठी तहकूब केली.