पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यायलाच हवी, हायकोर्टाने ठाणे पालिकेला बजावले

उघडय़ा मॅनहोलमध्ये पडून अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहेत. केवळ मॅनहोलच नव्हे, तर रस्त्यावरील खड्डय़ांमुळेदेखील अपघाताच्या घटना घडत आहेत. प्रशासनाच्या कामचुकारपणामुळे अशा अपघातात निष्पापांचा बळी जातो. अशा अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या किंवा जखमी झालेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई प्रशासनानेच द्यायला हवी अशा शब्दांत हायकोर्टाने ठाणे पालिकेला खडसावले.

रस्त्यांवरील खड्डे व उघडय़ा मॅनहोल प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सोमवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याप्रकरणी मध्यस्थी याचिका दाखल करणाऱया अॅड. रुजू ठक्कर यांनी न्यायालयाला सांगितले की, ठाण्यातील धर्मवीर नगर येथील ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ सुमारे 20 फूट खोल असलेल्या उघडय़ा मॅनहोलमध्ये चुकून पडून एका दोन वर्षांच्या मुलाला दुखापत झाली तर 23 नोव्हेंबर रोजी पालघर जिह्यातील एका घटनेचाही उल्लेख त्यांनी केला, दुचाकी एका मोठय़ा खड्डय़ात आदळल्याने झालेल्या अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याचा सहकारी जखमी झाला होता.