मुलीचे अनेक बॉयफ्रेंड आहेत ही आईने केलेली अतिशयोक्ती!

आपल्या मुलीचे अनेक बॉयफ्रेंड आहेत, असा युक्तिवाद करत तिच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप लावणाऱया आईला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. ही तर आईने केलेली अतिशयोक्ती असून मुलीकडून मारहाण केल्याच्या आईच्या दाव्यात काहीच तथ्य नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांनी याचिकाकर्त्या मुलीविरोधात सत्र न्यायालयातील खटला रद्द करण्याचे आदेश दिले.

सत्र न्यायालयातील कौटुंबिक हिंसाचाराचा खटला रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत एका महिलेने ऍड. केंनी ठक्कर यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितले की आपल्याला अभ्यासासाठी ऑस्ट्रेलिया येथे जायचे असून सत्र न्यायालयातील खटला तसेच तक्रार रद्द करण्यात यावी.

या युक्तिवादाला मुलीच्या आईने आक्षेप घेत विरोध केला. एवढेच नव्हे, तर सुनावणीवेळी कोर्टाला सांगितले की, मुलीचे अनेक बॉयफ्रेंड आहेत. हायकोर्टाने हे वाक्य ऐकताच संताप व्यक्त करत वकिलाला ताबडतोब युक्तिवाद थांबवण्यास सांगितले होते. आज न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने याप्रकरणी राखून ठेवलेला निकाल जाहीर केला.

आपली प्रतिक्रिया द्या