
प्रसिद्ध नेमबाज हेमंत बालवडकरला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करण्यासाठी सहा नवीन शस्त्र घ्यायची आहेत. यासाठी या नेमबाजाने गृह राज्यमंत्र्यांकडे रितसर परवानगी मागितली, पण गेल्या आठ महिन्यांपासून यावर निर्णय न घेणाऱ्या गृह राज्यमंत्र्यांना उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. दोन आठवडय़ांत यावर निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने गृहराज्य मंत्र्यांना दिले आहेत.
हेमंतने नेमबाजीच्या अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्याने अनेक जेतेपदे पटकावली आहेत. सरावासाठी त्याच्याकडे चार नेमबाजीच्या गन आहेत. अधिक चांगल्या सरावासाठी त्याला अजून सहा गन घ्यायच्या आहेत. यासाठी त्याने पुणे पोलिसांकडे अर्ज केला. पुणे पोलिसांनी जानेवारी-2025 मध्ये परवानगी नाकारली. याविरोधात त्याने गृह राज्यमंत्री यांच्याकडे फेब्रुवारी महिन्यात अपील केले.
केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे सहा आठवडय़ांत हेमंतच्या अपिलावर निर्णय होणे अपेक्षित होते. हा निर्णय न झाल्याने हेमंतने न्यायालयाचे दार ठोठावले. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. हेमंतचा अर्ज अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. या अर्जावर दोन आठवडय़ांत निर्णय घेण्याचे आदेश खंडपीठाने गृह राज्यमंत्र्यांना दिले.
गृह राज्यमंत्र्यांची विनंती फेटाळली
हा निर्णय घेण्यासाठी अजून मुदत द्यावी, अशी विनंती सरकारी वकील मनीष पाबळे यांनी केली. नियमाप्रमाणे सहा आठवडय़ांत निर्णय होणे अपेक्षित होते. तरीही हा निर्णय झाला नाही, असे नमूद करत न्यायालयाने ही विनंती अमान्य केली. यावरील पुसुनावणी 3 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे.
राष्ट्रीय रायफल असोसिएशनकडून सन्मान
मी विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालो आहे. प्रसिद्ध नेमबाज, असे रायफल असोसिएशनकडून मला गौरवण्यात आले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी मला अतिरिक्त सहा शस्त्रांची आवश्यकता आहे. त्यामुळे माझ्या अर्जावर वेळेत निर्णय होणे अपेक्षित आहे, असे हेमंतने याचिकेत नमूद केले आहे.