आज खेळणार नन्हे-प्यारे बच्चे!

बऱ्याच सिनेमांत इतर कलाकारांची आँखें निकाल कर गोटियां खेळताना आपण शक्ती कपूरला खूपदा ऐकलंय! पण प्रत्यक्षात तो मोठा मजेशीर माणूस असावा. अनेक वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, त्याची बायको शिवांगी कोल्हापुरे जेव्हा त्याच्यावर नाराज व्हायची तेव्हा तो तिला राजी करण्यासाठी ‘मैं तो नन्हा सा, प्यारा सा, छोटा सा बच्चा हूं’ असं म्हणत मनवायचा! नंतर हेच वाक्य ‘चालबाज’ चित्रपटात वापरलं गेलं अन् लोकप्रिय झालं.

असो, या स्पर्धेतले असेच तीन नन्हे, प्यारे अन् छोटे बच्चे आज दोन सामने खेळतायत. संयुक्त अमिरात वि. ओमान आणि श्रीलंका वि. हाँगकाँग. पहिल्या सामन्यातले दोन्ही संघ अनुक्रमे हिंदुस्थान आणि पाकिस्तानविरुद्ध उताणे पडलेले आहेत. संयुक्त अमिरात हिंदुस्थानविरुद्ध जेमतेम 57 धावांत गडगडला होता आणि पाकिस्तानने ओमानला 93 धावांनी धूळ चारली होती. दोन्ही संघांसाठी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आजचा सामना जिंकणं क्रमप्राप्त आहे.

दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध आठ टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत अन् दोघांनी चार-चार सामने जिंकलेले आहेत. अबुधाबीच्या झायेद स्टेडियमवर होणारा हा सामना कुठला संघ अधिक चांगली फलंदाजी करतो यावर अवलंबून आहे. तसंच, सामन्यात प्रथम फलंदाजी कुठला संघ करतो हेही महत्त्वाचं ठरेल.

हा सामना आपल्याला खुर्चीच्या कडेवर बसवू शकेल, छातीचे ठोके वाढवू शकेल, कदाचित नखं कुरतडण्याची वाईट सवयही लाऊ शकेल!

तिसरा बच्चा हाँगकाँगची गाठ आहे, ताकतवान श्रीलंकेशी. श्रीलंकेने परवाच बांगलादेशचा चोळामोळा केला. बांगलादेशचं 139 धावांचं लक्ष्य त्यांनी तब्बल 32 चेंडू राखून गाठलं यातच त्यांच्या बेबंद खेळाचं मर्म स्पष्ट होतं. रोजचा गोंधळ आज सायंकाळी साडेपाचलाच सुरू होणार आहे याची सकलजनाने नोंद घ्यावी एवढी नम्र विनंती!