सीमेवर आता दहशतवाद्यांना रोखणार अदृश्य भिंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया आणि घुसखोरी रोखण्यासाठी हिंदुस्थानने जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर प्रथमच ‘हायटेक सर्व्हिलन्स सिस्टीम’द्वारे जमीन, पाणी आणि हवेत एक अदृश्य इलेक्ट्रॉनिक भिंत उभारली आहे. त्यामुळे जल, स्थल आणि हवाई मार्गाने होणारी घुसखोरी रोखता येणार आहे. घुसखोरीचा प्रयत्न झालाच तर योग्य वेळेत हाणून पाडता येणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह सोमवारी जम्मूतील दोन अशा पथदर्शी प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. एका इलेक्ट्रॉनिक भिंतीमुळे जम्मूतील साडेपाच कि.मी. सीमेवर देखरेख ठेवता येणार आहे. या प्रणालीचे नाव कॉप्रिहेन्सिव्ह इण्टिग्रेटेड मॅनेजमेंट सिस्टीम (सीआयबीएमएस) असे आहे.

‘सीआयबीएमएस’ काम असे फत्ते करेल
1) सीआयबीएमएस यंत्रणेत थर्मल इमेजर, इफ्रारेड आणि लेझर बेस्ड इन्टडर अलार्म या सुविधा आहेत. जमिनीवर अदृश्य कुंपण, हवाई टेहाळणीसाठी विमान आणि जमिनीखालीही सेन्सर असल्यामुळे घुसखोरीचा प्रयत्न झाल्यास सुरक्षा दलांना त्याची सूचना मिळेल.
2) दहशतवादी कित्येक वेळा पाच-पाच किलोमीटरची भुयारे खोदून घुसखोरी करतात. पण या सिस्टीममध्ये रडार आणि सोनार सिस्टीम असल्यामुळे जमिनीखालील, पाण्याखालून होणारी घुसखोरीही रोखता येणार आहे.
3) अशा प्रकारच्या व्हर्च्युअल भिंतीचा हा पहिलाच प्रयोग आहे.
4) या प्रणालीमुळे सैन्यबळ, शस्त्रास्त्रांचा योग्य वापर तर होईलच पण अचूक वेळेत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडता येईल.