मुंबईतील उच्चशिक्षित उत्तर भारतीयांचा शिवसेनेला पाठिंबा

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच शिवसेनेला विविध समाजातील नागरिकांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे. मुंबईतील उत्तर भारतीय समाजातील डॉक्टर, वकील, इंजिनीअर, सीए अशा उच्चशिक्षितांच्या शिष्टमंडळाने नुकतीच ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आम्ही शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आगामी महापालिका निवडणुका असो किंवा कोणताही कार्यक्रम असो… आपण द्याल ती जबाबदारी आम्ही विश्वासाने पार पाडू, असे आश्वासन या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांना दिले.

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली पूर्व विधानसभा समन्वयक प्रमुख अॅड. कमलेश यादव यांच्या पुढाकाराने उत्तर भारतीय समाजातील उच्चशिक्षित शिवसेनेसोबत आले आहेत. ‘मातोश्री’ निवासस्थानी या सर्वांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आम्ही शिवसेनेसोबत खंबीरपणे उभे आहोत, असा शब्द यावेळी या उच्चशिक्षितांनी दिला.

चारकोप विधानसभाप्रमुख संतोष राणे व विभागप्रमुख अजित भंडारी यांनीही यासाठी प्रयत्न केले. यावेळी विभागप्रमुख-आमदार महेश सावंत,  अॅड. सुनील सिंह, अॅड. निहाज खान, अॅड. अशोक जैस्वाल, अॅड. नंदलाल यादव, डॉ. कृष्णकांत मिश्रा, अॅड. तारिक खान, इंजिनीअर अरविंद यादव, सीए सुजित यादव, डॉ. संगीता यादव, अॅड. शोभा यादव, अॅड. सुनीता मौर्या यांच्यासह उत्तर भारतीय बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.