हिमा दासची घोडदौड सुरुच; महिनाभरात पटकावले पाचवे सुवर्णपदक

hima-das-gold

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ढिंग एक्स्प्रेस या नावाने प्रसिद्ध असलेली हिंदुस्थानची युवा धावपटू हिमा दास हिची घोडदौड सुरूच आहे. झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत शनिवारी हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. हिमा दास हिचे महिनाभरातील हे पाचवे सुवर्णपदक आहे. हिमा हिने ट्विटरवर एक फोटो शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे. झेक प्रजासत्ताक येथे 400 मीटर शर्यत तिने 52.09 सेकंदात पूर्ण केली. याआधी झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या टबोर अ‍ॅथलेटिक्स मीट स्पर्धेत तिने 200 मीटर शर्यतीत सुवर्ण कामगिरी केली. 23.25 सेकंदाची वेळेत तिने ही चमकदार कामगिरी केली होती.

हिमाने यापूर्वी 2 जुलैला युरोपात, 7 जुलैला कुंटो अॅथलेटिक्स मीटमध्ये, 13 जुलैला झेक गणराज्यात आणि 17 जुलैला टाबोर ग्रँड प्रिक्समधील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुवर्ण पटकावले आहे. झेक रिपब्लिकमधील या स्पर्धेत हिंदुस्थानच्या व्ही. के. विस्मयाने दुसरे स्थान पटकावले. विस्मयाने 400 मीटरचे अंतर 52.48 सेकंदात पार केले. तर तिसऱ्या स्थानी आलेल्या सरिताबेन गायकवाडने हेच अंतर 53.28 सेकंदात पार केले. पुरुषांच्या 200 मीटरच्या स्पर्धेत मोहम्मद अनसने 20.95 सेकंदात हे अंतर पार करत दुसरे स्थान पटकावले. तर, पुरुषांच्या 400 मीटरच्या स्पर्धेत हिंदुस्थानच्या नोह निर्मल टॉमने हे अंतर 46.05 सेकंदात पार करत रौप्य पदक मिळवले. तसेच पुरुषांच्या 400 मीटरच्या अडथळा शर्यतीत हिंदुस्थानच्या एम. पी. जाबीरने हे अंतर 49.66 सेकंदात पार करत सुवर्णपदक पटकावले. जितीन पॉलने हे अंतर 51.45 सेकंदात पार करत दुसरे स्थान पटकावले.

आपली प्रतिक्रिया द्या