7 फेब्रुवारी 1968 रोजी चंदिगड येथून लेहला जाताना वायुदलाच्या विमानाचा अपघात झाला होता. हिमाचल प्रदेशातील रोहतांग पास येथे विमान गायब झाले होते. या विमानात केरळचा 22 वर्षीय जवान होता. त्याचे नाव थॉमस चेरियन होते. तेव्हापासून चेरियनचे कुटुंब त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. विमानातील कुणी जिवंत असण्याचीही शक्यता नव्हती. चेरियनचा मृतदेहही हाती लागला नव्हता. अशातच 56 वर्षांनंतर काल चेरियनचा मृतदेह सापडल्याची वार्ता त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली.
थॉमस चेरियन पथानामथिट्टा जिह्यातील एथनूर येथे राहत होता. चेरियनचा मृतदेह सापडल्याचे समजताच कुटुंब भावनाविवश झाले. चेरियनची बहीण म्हणाली, ही कसली परिस्थिती आहे. याचा आनंद मानावा की दुःख. भावाचे अंत्यसंस्कार करायला मिळतील ही आशा आम्ही सोडून दिली होती. ही दुर्घटना घडली तेव्हा मी 12 वर्षांची होते. भावाच्या आठवणी माझ्यासोबत आहेत.
लवकरच अंत्यसंस्कार
मृतदेह हाती लागल्यानंतर आता लवकरच थॉमस चेरियनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, असे त्यांच्या धाकटय़ा भावाने सांगितले. चेरियनचा फोटो नसल्याबद्दल भावाने खंत व्यक्त केली. सैन्यदलाच्या रेकॉर्डमध्ये चेरियनचा फोटो मिळेल अशी आशा व्यक्त केली.
– बर्फाळ भागात चार दशकांहून अधिक काळ जवानांचे मृतदेह दडले होते. लष्कराने डोगरा स्काऊट्स आणि तिरंगा माऊंटन रेस्क्यूच्या संयुक्त अभियानामध्ये जवानाचा मृतदेह शोधला. या शोधमोहिमेत 2019 पर्यंत पाच जवानांचे मृतदेह सापडले होते. चंद्रभागा पर्वत अभियानात आणखी चार जवानांचे मृतदेह सापडल्याचे सैन्यदलाच्या अधिकाऱयाने सांगितले.
नवे हवाईदल प्रमुख, नवी जबाबदारी…
हिंदुस्थानी हवाई दलप्रमुख एअर मार्शल अमर प्रीत सिंह यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. या वेळी ते दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे आपल्या सहकाऱयांसोबत दिसत आहेत. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला त्यांच्या मातोश्री आवर्जून उपस्थित होत्या. पदभार स्वीकारल्यानंतर सिंह यांनी पदस्पर्श करत आईचा आशीर्वाद घेतला. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.