मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला; हिंगणघाट पीडितेच्या उपचाराचा खर्च उचलला

1982

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात दुर्दैवी मृत्यू झालेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला आहे. पीडितेच्या उपचारासाठी झालेल्या 5 लाख 43 हजार रुपये खर्चाची रक्कम राज्य सरकारने रुग्णालयाकडे सुपूर्द केली आहे.

हिंगणघाटमध्ये वनस्पतिशास्त्र विषयाची प्राध्यापक असलेल्या तरुणीवर एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न 3 फेब्रुवारी रोजी केला. यानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात होता. या तरुणीची मृत्यूशी सुरू असणारी झुंज 10 फेब्रुवारी रोजी संपली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात या मुलीच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार उपचासाठी झालेला 5 लाख 43 हजार 441 रुपयांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून रुग्णालयाला देण्यात आला आहे. सरकारने मदत जाहीर करण्याआधी पीडितेच्या कुटुंबाने उपचारासाठी 60 हजार रुपये खर्च केले होते. ही रक्कमही राज्य सरकारने धनादेशाद्वारे पीडितेच्या वडिलांकडे सुपूर्द केली आहे.

  • रुग्णालयाकडून अपेक्षित खर्चाची आकडेवारी मागवण्यात आली होती. त्यावेळी रुग्णालयाने 11 लाख 90 हजार रुपये खर्च येईल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात चार लाख रुपये रुग्णालयाला देण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर उर्वरित रक्कम एक लाख 43 हजार 441 रुपये रुग्णालयाला देण्यात आली.
आपली प्रतिक्रिया द्या