भरड धान्यापासून साकारली गणरायाची प्रतिमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोलीचे अण्णा जगताप यांच्या संकल्पनेतून ‘निसर्गशाळा’ उपक्रम राबवण्यात येतो. तसेच ‘एक मूल तीस झाडे’ हे अभियान गेली सात वर्षे सुरू आहे. या निसर्गशाळेत परभणी जिह्यातील चारठाणा येथील आर्या आणि अनया ढाकणे या बहिणी निसर्ग रक्षणाचे धडे गिरवत आहेत. या बहिणींनी या वर्षी भरड धान्यापासून गणरायाची प्रतिमा साकारली आहे.

निसर्गशाळेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. याअंतर्गत ‘झाडाचा गणपती’ ही स्पर्धा घेतली जाते. यामध्ये राज्यभरातून हजारो मुले सहभागी होतात. ते पान, फुले, बिया अशा पर्यावरणपूरक गोष्टींपासून गणराया साकारण्याचा प्रयत्न करतात. आपण 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे करत आहोत. भरड धान्याचे (मिलेट्स) महत्त्व पटवून देण्यासाठी आर्या ढाकणे हिने भरड धान्यापासून गणरायाची प्रतिमा तयार केली. त्यासाठी तिने ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, राळे व खपली गव्हाचा वापर केला आहे. भरड धान्याचे आहारातील महत्त्व सांगण्यासाठी भित्तीपत्रके तयार करून त्याची सजावट केली आहे. नववीत शिकणाऱ्या आर्याने दिला निसर्ग संवर्धनाचा संदेश

झाडाचा गणपती स्पर्धा
माती, ध्वनी आणि पाणी प्रदूषित करणारे घटक वापरून उत्सव साजरा होतो. त्याऐवजी मुलांनी पर्यावरणपूरक उत्सवाचे महत्त्व समजून पाने, फुले, बिया यांच्यापासून सजावट करावी हा निसर्गशाळेचा उद्देश आहे. ‘झाडाचा गणपती’ ही स्पर्धा त्यासाठीच आयोजित केली जाते. यामध्ये 2022 सालचा मूर्तीकार राम सुतार पुरस्कार पूर्वजा कोकाटे या चौथीत शिकणाऱया मुलीला मिळाला आहे. पूर्वजाने पालकांच्या मदतीने अनोख्या संकल्पनेतून झाडाचा गणपती साकारला. मुले निसर्गाच्या जवळ जावीत हा उद्देश आहे, असे अण्णा जगताप यांनी सांगितले.

परभणी जिह्यातील चारठाणा येथील आर्या आणि अनया ढाकणे या बहिणींनी भरड धान्यापासून गणेशाची प्रतिमा साकारून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला आहे.