
मालेगाव येथून बंदोबस्तावरुन परतलेल्या हिंगोलीच्या राज्य राखीव पोलिस दलाच्या 107 पैकी सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या जवानांना एसआरपीएफ कॅम्पमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते.
हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारामधील 107 अधिकारी व जवान मालेगाव येथून तर 84 जवान मुंबई येथून बंदोबस्त आटोपून हिंगोलीमध्ये काल परतले होते. या 191 अधिकारी व जवानांच्या घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. यापैकी सहा जणांना कोरोणाची लागण झाल्याचे तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर समोर आले आहे. हे कोरोना बाधित एसआरपीएफचे सहा जवान मालेगाव येथून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या उच्चपदस्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘दैनिक सामना’ प्रतिनिधीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.



























































